लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात बुधवारी पहिल्यांदा उच्चांकी ३,७११ कोरोना चाचण्यांची नोंद झालेली आहे. यामध्ये १०.९४ टक्के पॉझिटिव्हिटीची नोंद झाल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचा सर्व भार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विषाणू परीक्षण प्रयोगशाळेवर आहे. या प्रयोगशाळेत आता नवीन मशीन बसविण्यात आल्याने नमुने तपासणीची किमान ९०० ने क्षमतावाढ झालेली आहे व परिणामी जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढलेली आहे. याशिवाय रॅपिड अँटिजेनच्या चाचण्याही होत आहेत. या चाचण्यांसाठी जिल्ह्यातील ११ खासगी प्रयोगशाळांना मनाई करण्यात आलेली आहे. सीएस, डीएचओ किंवा एमओएच यांच्या अतंर्गत असलेल्या केंद्रावरच सध्या रॅपिड अँटिजेन चाचण्या होत आहे. त्यादेखील हायरिस्कच्या व्यक्ती, आजारी व्यक्ती किंवा गर्भवती स्त्रियांचीच फक्त रॅपिड टेस्ट केली जात असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.विद्यापीठाच्या प्रयोगशाळेला आता १० महिने पूर्ण होत आहेत. या कालावधीत १,२५,००८ आरटी-पीसीआर चाचण्या करण्यात आल्या. जिल्ह्यात संशयित रुग्णांचे नमुने मार्च २०१९ पासून घेण्यात येत आहे. सुरुवातीला नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व नंतर वर्धा व अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेतून नमुने तपासणी व्हायची. यात अहवाल मिळायला वेळ लागायचा.
रॅपिड अँटिजेन : १०.२७% पॉझिटिव्ह जिल्ह्यात आतापर्यंत रॅपिड अँटिजेनच्या १,१८,१७२ चाचण्या करण्यात आल्यात व यात १२,१४७ नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. या चाचण्यांमध्ये १०.२७ टक्के पॉझिटिव्हिटीची नोंद करण्यात आलेली आहे. यामध्ये शहरात ६२,३७१ चाचण्या करण्यात आल्या व यामध्ये ६,५४१ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या याशिवाय ग्रामीणमध्ये ५५,८०१ चाचण्या करण्यात आल्या व यामध्ये ५,६०६ नमुने पॉझिटिव्ह नोंद झाले आहे.
१८ ते २० तासांत ‘एसएमएस’संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या लॅबमध्ये आता एक सॉफ्टवेअर लावण्यात आले. यात चाचण्या झाल्यावर व त्याची नोंद केल्यानंतर संबंधितांना पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्हचा ‘एसएमएस’ १८ ते २० तासंत जातो व त्यात पॉझिटिव्ह असल्यास त्यांनी सीएस, डीएचओ व एमओएच यांच्या कायार्लयातील संबंधित क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येते व या सॉफ्टवेअरचा लॉगइन आयडी या तिन्ही कार्यालयांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
विद्यापीठ लॅबच्या चाचण्यांमध्ये १७.४० पॉझिटिव्हिटी विद्यापीठाचे लॅबद्वारे आतापर्यंत १,२५,००८ चाचण्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १४,३८४ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झालेली आहे. ही १७.४० टक्के पॉझिटिव्हिटी आहे. यात शहरातील ६७,७५० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १४,३८४ पॉझिटिव्हची नोंद झाली, तर ग्रामीणमधील ५७,२५८ चाचण्या करण्यात आल्या. यात ७,३७१ अहवाल पाॅझिटिव्ह आढळले आहेत. याव्यतिरिक्त खासगी लॅबनी २३,१३७ चाचण्या केल्या. यात ७,८४१ पॉझिटिव्ह नोंदविले गेले.