शेतकऱ्यांची थट्टा, सरासरी उत्पादनाच्या मर्यादा ठरेना : कृषी विभाग, महामंडळ तळ्यात-मळ्यात
श्यामकांत पाण्डेय
धारणी : आदिवासी विकास महामंडळातर्फे ७ नोव्हेंबरपासून मक्याची खरेदी सुरू झाली आहे. मात्र, वेळोवेळी प्रतिहेक्टर सरासरी उत्पादनाच्या नावाखाली शासनाकडून नवनवे दिशानिर्देश येत असल्याने सरकारने आमची थट्टा चालविली आहे का, असा प्रश्न मका उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. तब्बल तीनदा याबाबतचे निर्णय फिरविण्यात आले. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा झालेला मका खासगी बाजारात कवडीमोल दराने विकावा का? याचे उत्तर आदिवासी विकास महामंडळाने द्यावे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
यंदा मेळघाटच्या शेतकऱ्यांना मक्याचे बंपर उत्पादन झाले. त्यांची खासगी बाजारात लूट होऊ नये, यासाठी आदिवासी विकास महामंडळाकडून हमीभावाने खरेदी सुरू करण्यात आली. शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी झाली. मात्र, हमीभावाने शेतकऱ्यांकडून किती मका खरेदी केला जाईल, याबाबत मर्यादा ठरवून देण्यात आली. सुरुवातीला प्रतिहेक्टर ३९ क्विंटलप्रमाणे मका खरेदी करण्यात आला. १५ दिवसांनंतर शासनाकडून प्रतीहेक्टर ३० क्विंटलप्रमाणे शेतकऱ्यांकडून मका खरेदी करावा, असे नवीन निर्देश प्राप्त झाले आहे. त्यामुळे नऊ क्विंटलप्रमाणे शेतकऱ्यांना मका परत करण्यात आला. यामध्ये शेतकऱ्यांची चांगलीच फरफट झाली. परंतु आता पुन्हा शासनाने प्रती हेक्टरी २८ क्विंटलप्रमाणे शेतकऱ्यांचा मका खरेदी करण्याचे पत्र पाठवल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. आता पुन्हा दोन क्विंटल अतिरिक्त खरेदी केलेला मका शेतकऱ्यांनी परत घेऊन जावा, असे आवाहन आदिवासी विकास महामंडळाने केला आहे.
सातबारावर असलेली मक्याची नोंद व प्रत्यक्षात झालेल्या उत्पादनातील तफावत पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळघाट विधानसभा अध्यक्ष हुकुमचंद मालवीय यांनी शेतकऱ्यांच्यावतीने आदिवासी विकास महामंडळ आणि सहायक जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. मात्र, त्यावर तोडगा निघाला नाही. उलट रोज नवनवे परिपत्रक काढून शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. एक महिन्यापासून मका विक्री केलेल्या शेतकऱ्यांना चुकारे मिळालेले नाही. यावर सहायक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या संचालक मिताली सेठी यांनी सन्मानजनक तोडगा काढावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
माल परत न्यायचा कसा?
अतिरिक्त खरेदी करण्यात आलेला मका शेतकऱ्यांनी घेऊन जावा, असे आवाहन आदिवासी विकास महामंडळाने केले आहे. त्यामुळे तो धान्यमाल आता घरी कसा आणावा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. धारणी तालुक्यातील अनेक गावे अतिशय दुर्गम क्षेत्रात आहेत. वाहतुकीची साधने अत्यल्प आहेत. अशा परिस्थितीत दोन चार शेतकरी एकत्र येऊन भाड्याची वाहने सांगून आपला धान्यमाल शहरात विकण्यास आणतात. आता तो पुन्हा घरी परत आणायचा असेल तर पुन्हा वाहनभाडे द्यावे लागेल, त्यापेक्षा तो धान्यमाल धारणीतच खासगी बाजारात कवडीमोल दरात विकण्याशिवाय शेतकऱ्यांजवळ पर्याय नाही.