अमरावती : वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी फार पूर्वीची आहे; मात्र त्याकडे राज्यकर्त्यांनी सातत्याने दुर्लक्ष केल्याने आंदोलकर्त्यांमध्ये काहीशी अनास्था आहे. परंतु केंद्रातील सरकार लहान राज्यांचे पुरस्कर्ते आहे. म्हणून भाजपच्या अजेंड्यावर स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मिती करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे ९ आॅगस्टला क्रांतिदिनी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीच्या मागणीसाठी ‘रेल देखो- बस देखो’ हे अभिनव आंदोलन केले जाणार आहे. याच दिवशी विदर्भ बंधन बांधले जाईल. या आंदोलनाची धुरा तरुणाईच्या हाती राहणार असल्याची माहिती ‘जन मंच विदर्भाचा’ संघटनेचे अतुल गायगोले यांनी गुरुवारी येथे आयोजित पत्रपरिषदेत दिली. स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी वेग घेते. पण, कालांतराने ती थंड होते. या कारणाचा शोध घेतला असता राजकारण्यांचा हस्तक्षेप वाढत असल्याचे स्पष्ट झाले. परिणामी हा लढा सुरु करताना आता चारित्र्यवान युवक आणि अराजकीय कार्यक र्त्यांची फळी निर्माण करण्याचे ठरविले आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचे फायदे, शिक्षण, रोजगार आदी विषय गावखेड्यात पोहोचविण्यासाठी तरुणांची फळी निर्माण करण्यात आल्याचे गायगोले यांनी सांगितले. केंद्रातील मोदी शासन लहान राज्य निर्मितीचे पुरस्कर्ते असून हे शासन स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करेल यात दुमत नाही. मात्र, ही मागणी गतिशील व्हावी, याकरिता शेतकरी, कलावंत, विचारवंत, विद्यार्थी, महिला आदींचा सहभाग गरजेचा आहे. त्यामुळे हा सहभाग वाढविण्यावर भर दिला जात असल्याचे संघटनेचे संयोजक बबन बेलसरे म्हणाले. ही चळवळ ग्रामीण भागात पोहोचविणे हा संघटनेचा प्रमुख उद्देश आहे. ‘गाव चलो अभियान’ यानुसार प्रत्येक गाव पिंजून काढले जाईल, असे अतुल यादगिरे यांनी सांगितले. ९ आॅगस्ट रोजी शहरातील प्रमुख चौकातून बुलेट रॅली काढण्यात येईल. ही रॅली प्रमुख आकर्षण राहणार आहे. तरुणाईचे पथनाट्य, नृत्याव्दारे स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीसाठी बंधन बांधले जाणार असल्याची माहिती सुशील पडोळे यांनी दिली. हे आंदोलन शांततेच्या मार्गांने चालणार असून ‘रेल देखो- बस देखो’ आंदोलनाप्रसंगी भजन- कीर्तन करुन स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीच्या मागणीकडे जनतेचे लक्ष वेधले जाणार असल्याचे विजय विल्हेकर यांनी सांगितले. या अभिनव आंदोलनात तरुणाईने मोठ्या संख्येने सामील होऊन स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचा लढा उभारण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन अतुल गायगोले यांनी केले. पत्रपरिषदेला बबन बेलसरे, विजय विल्हेकर, अतुल यादगिरे, सुशील पडोळे, अतुल खोंड, जयदीप सराफ, सुशील बडनेरकर, प्रदीप पाटील, वसुसेन देशमुख आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
तरुणाईच्या हाती स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचा लढा
By admin | Updated: August 7, 2014 23:41 IST