अमरावती : पीडित महिला व बालकांना अर्थसहाय्य व पुनर्वसनासाठी जिल्हास्तरावर शासनाची मनोधैर्य टीम स्थापन केली जाणार आहे. जिल्हास्तरावरील विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश राहणार असून टीमच्या सदस्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. पीडित महिला व बालकांना तातडीने आधार मिळावा, मानसिक आघातामधून बाहेर पडण्यास मदत व्हावी, पीडितांचा जाब जबाब नोंदविणे, घडलेल्या घटनेसंदर्भात आवश्यक तो तपास करणे, पिडीतांची वैद्यकीय तपासणी करणे, सदर घटनेबाबत आवश्यक परिस्थितीजन्य पुरावा सादर करणे तसेच पिडीतांना शेवटपर्यंत सहाय्य करणे ही उद्दीष्ट टिमची आहेत. पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या जिल्हा स्तर, तालुका स्तर, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, मानसोपचार तज्ज्ञ, नर्स तसेच जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी यांच्या अखत्यारित येणारे सर्व संरक्षण अधिकारी, बाल परिविक्षा अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्यातील निवडक अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश मनोधैर्य टिम मध्ये राहणार आहे. जवळपास तिनही विभागातील ५० टक्के अधिकारी व कर्मचारी यांना टप्प्या टप्प्यात महिला व बालविकास आयुक्त पुणे यांच्याकडे असलेल्या राहत कक्षाच्या सहकार्याने व तज्ज्ञ सधन व्यक्तीच्यामार्फत जिल्ह्यातील मनोधैर्य टीमला प्रशिक्षण देण्यात येईल. पोलीस विभागातील अधिकाऱ्यांचा टीममध्ये समावेश करण्याबाबतची यादी पोलीस अधिक्षकांनी निश्चित करावयाची आहे. निश्चित नावांची यादी जिल्ह्याच्या महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे पाठवायची आहे. जिल्ह्यातील विविध विभागातील प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांची यादी महिला व बालविकास आयुक्त पुणे यांच्याकडे सादर केल्यानंतर टीममधील संबंधितांना दोन महिन्यांच्या आत आयुक्तालयाने प्रशिक्षण कार्यक्रम राबवायचा आहे. जिल्ह्यातील पीडित बालकांवरील अत्याचारातील पीडितांना मनोधैर्य टीम आधार देणार आहे. अशी प्रकरणे हाताळण्यासाठी प्राधान्याने मनोधैर्य टीमचे अधिकारी किंवा कर्मचारी त्यांना पाठविण्याची जबाबदारी पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
पीडितांच्या आधारासाठी शासनाची मनोधैर्य 'टीम'
By admin | Updated: August 30, 2014 23:21 IST