अमरावती : वलगाव येथून शासकीय तांदळाची अफरातफर होत असल्याची गुप्त माहिती गुरुवारी गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळताच त्यांनी तेथे छापा मारुन शासकीय तांदळाने भरलेल्या तीन मीनीट्रकसह चौघांना पकडले. त्यांना चौकशीसाठी वलगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.वलगाव येथील आठवडी बाजारजवळ असणाऱ्या सीता नगरातील रहीवासी शेख सलीम शेख हबीब (४५) यांच्याकडे तीन मीनीट्रक आहे. गुरुवारी विलासनगर मार्गावरील वेअर हाऊस येथून त्याच्या ट्रकमध्ये शासकीय तांदूळ भरण्यात आला. तादळाने भरलेले ट्रक कंट्रोलमध्ये जाण्यासाठी निघाले होते. हे ट्रक वलगाव- चांदुर बाजार मार्गावर थांबले. दरम्यान त्यातील शासकीय तांदळाची अफरातफर होत असल्याची गुप्त माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली. पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी राठोड त्यांच्या कर्मचाऱ्यांसह मध्यरात्री १ वाजता घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तेथून शासकीय तांदळाने भरलेल्या तीन ट्रकांसह चौघांना पकडले. यामध्ये ट्रकमालक शेख सलीम, ट्रक चालक रवीशंकर पवार (२५,रा. बादारपुरा), अब्दुल कलाम अब्दुल सलाम (४०) व लीयाज अली नजर अली (४०, दोन्ही रा. सौदागरपुरा) यांचा समावेश आहे. त्यांना चौकशीसाठी वलगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी ४ वाजता गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गोपाल उपाद्धे, पुरवठा अधिकारी जी. एस. पुरी हे वेअर हाऊस येथे पोहचले. ट्रकमध्ये शासकीय तांदळाचे किती कट्टे भरण्यात आले? त्यामधील माल सुरक्षित आहे का? याची माहिती वेअर हाऊसच्या अधिकाऱ्यांकडून घेणे सुरु असून चौकशी सुरु असल्याची माहिती उपाध्ये यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. (प्रतिनिधी)
शासकीय तांदळाने भरलेले ट्रक पकडले
By admin | Updated: August 9, 2014 00:38 IST