----------------------------------------------------------------------------------------------------------
मनीष तसरे
अमरावती येथील सर्व सर्वपशुचिकित्सालयात प्रसूती
अमरावती : दोन धड, आठ पाय, मात्र डोके एकच अशी ‘कोजॉईन्ड ट्विन्स’ अमरावती येथील सर्वपशुचिकित्सालयात बकरीच्या पोटी जन्माला आले. ही घटना सोमवारी दुपारी १२ वाजता निदर्शनास आली.
बकरीने एकंदर चार पिले दिली. त्यापैकी दोन स्वस्थ आहेत. अमरावती शहरापासून पाच किमी अंतरावरील अतुल भीमराव कांबळे यांची बकरी अडल्याने त्यांनी तिला अमरावती येथील प्रभात चौकातील जिल्हा सर्व पशुचिकित्सालयात आणले. येथील पशुचिकित्सक डी.एन. हटकर यांच्या मार्गदर्शनात बकरीची प्रसूती झाली. त्यानंतर एक डोके, मात्र दोन धड आणि आठ पायांचे पिलू जन्माला आले. ते जन्मत:च मृत निपजल्याचे हटकर यांनी स्पष्ट केले. या पिलाची दोन्ही धडे नर होती. यानंतर बकरीने नर व मादी अशी दोन स्वस्थ पिले प्रसविली. त्यांच्यात वैद्यकीयदृष्ट्या कुठलीही गुंतागुंत नव्हती. सहायक आयुक्त (पशुसंवर्धन) डॉ. राजू खेरडे, डॉ. सागर ठोसर या पशुचिकित्सकांनी त्यांना सहकार्य केले.
लाखात एखादे प्रकरण
संख्यात्मक गुणसूत्र विकृती (न्यूमेरिकल क्रोमोसोमल ॲब्नॉर्मलिटिस) या दोषामुळे लाखातून एखादे पिलू असे जन्माला येते. अशी पिले जास्त काळ जगत नाहीत, अशी माहितीदेखील पशुचिकित्सकांनी दिली.