उदासीनता : खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूटअमरावती : दिवाळीचा सण अवघा आठवडाभरावर आला आहे. तरीही अद्याप जिल्हाभरात सीसीआय किंवा पणनची कापूस खरेदी केंद्र सुरू झालेली नाहीत. त्यामुळे ही खरेदी केंद्रे केव्हा सुरू होतील याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. खासगी व्यापारी कमी भावात शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करीत आहेत. यावर्षी खरीप पिकासाठी पोषक पाऊस झाला. या पावसामुळे शेतशिवार चांगलेच बहरले आहे. परंतु परतीच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे सोयाबीन व उडीद पिकाचे नुकसान झाले. या पावसाचा कपाशीला फायदा झाला. जिल्ह्यात दरवर्षी सात ते साडेसात हेक्टरवर खरीप पेरणी करण्यात येते. त्यामध्ये कापूस, सोयाबीनचे क्षेत्र अधिक असते. यंदा १ लाख लाख १३ हजार ९२ हेक्टरवर कपाशीची पेरणी करण्यात आली होती. त्यातच यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे कापूस उत्पादनात वाढ होणार असल्याची आशा शेतकऱ्यांना आहे. वास्तविक पाहता दरवर्षी दसऱ्याला शासनाकडून कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येतात. या खरेदी केंद्रावर शेतकरी आपला कापूस विक्रीसाठी नऊन दिवाळी साजरी करतात. परंतु यंदा दसरा होऊन दोन आठवड्याचा कालावधी उलटून गेला असताना देखील शासनाकडून कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. याचाच फायदा खासगी व्यापारी घेऊन ते शेतकऱ्यांकडील कमी भावात कापूस खरेदी करीत आहेत. सणासुदीसाठी पैशाची गरज असल्याने शेतकरी मिळेल त्या भावात कापसाची विक्री करीत आहेत. राज्यात फेडरेशन व सीसीआयच्यावतीने कापसाची खरेदी करण्यात येते. सीसीआयने कापूस खरेदीची शासनाकडे परवानगी मागितली आहे. आॅक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत परवानगी मिळून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात खरेदी केंद्र सुरू होतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. परंतु तोपर्यंत हजारो क्विंटल कापूस खासगी व्यापाऱ्यांच्या घशात जाणार आहे. परिणामी शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागणार आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्यात तत्काळ कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. शेतकरी विरोधी भाजप सरकारचे धोरण आहे. जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा सर्वाधिक आहे. सोयाबीनला २७०० रूपये हमीभाव देणे गरजेचे आहे. शासन सोयाबीनला हमीभाव व कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. - वीरेंद्र जगताप, आमदार, धामणगाव रेल्वेअच्छे दिनची घोषणा करणाऱ्या भाजप सरकारने शेतकऱ्यांना अच्छे दिन आणण्यासाठी कापसाला चांगला हमीभाव जाहीर करावा, विविध संकटाने मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला हमीभाव द्यावा, ज्यामुळे शेतकरी आत्महत्या थांबू शकेल. - उमेश कावरे, शेतकरीतीन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाचा सामना करीत आहे. यंदा कापसाचे पीक समाधानकारक आहे. शासनाकडून कापसाला योग्य भाव दिल्यास खऱ्या अर्थाने न्याय मिळेल, त्यासाठी शासनाने निर्णय घ्यावा व कापूस खरेदी केंद्र सुरू करावे.- विलास रेहपांडे,शेतकरी
जिल्ह्यात कापूस खरेदी करण्यास मुहूर्त मिळेना
By admin | Updated: October 24, 2016 00:27 IST