धामणगाव रेल्वे : कामाला सुरूवात अथवा व्यापाराचा शुभारंभ करण्यापूर्वी उजव्या सोंडेच्या गणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय आजही पुढे पाऊल टाकण्याचा निर्धार कुणीही करीत नाही. कामगार व व्यापाऱ्यांच्या श्रध्देचा म्हणून शहरातील जुन्या बी़जी़टी़आय येथील पुरातन गणपती मंदिराची ओळख आहे़धामणगाव शहर एकेकाळी व्यापारी नगरी म्हणून ओळखले जात असत. जयरामदास भागचंद या उद्योग समूहाचे मालक भागचंद अग्रवाल यांनी १८९५ मध्ये जयपूर येथून ७ फूट उंचीची उजवी सोंड असलेली संगमरवर दगडाची मूर्ती स्वत: आणून त्यांच्या इंन्डस्ट्रीजमध्ये प्राणप्रतिष्ठा केली होती़ अखंड आठ दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून अन्नकुट करण्यात आला होता़तद्नंतर ही इंन्डस्ट्रीज नेमाणी यांना तर त्यानंतर भारत जनरल अॅन्ड टेक्साईल इंन्डस्ट्रीज या बिर्ला समूहाच्या उद्योगाला विकण्यात आली़ त्यावेळी कापसाकरिता प्रसिध्द असलेल्या या शहरात बिर्ला उद्योग समूहाच्यावतीने जिनिंग़, प्रेसिंग आॅईल व रिफाईन्डींग हे उद्योग चालविण्यात येत होते. येथे उत्पादित केलेले सरकीचे तेल मध्यप्रदेश व महाराष्ट्रात रेल्वे बोगीने पाठविले जात असे. त्यामुळे दोन ते तीन राज्यांतील व्यापारी येथे लघु उद्योगासाठी येत असत. येथे काम करणारे कामगार, हमाल तसेच व्यापारी उजव्या सोंडेच्या गणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय कामाला सुरूवात करीत नव्हते़ अनेक कामगार दुपारचे जेवण करताना आणलेल्या डब्यामधून नैवेद्य गणपतीसमोर ठेवत असे़ बी़जी़टी़आय या उद्योग समीहाकडून राकेश खत्री यांनी ही जिनिंग खरेदी केली आहे़ सद्यस्थितीत त्यांचा व्यवसाय येथून सुस्थितीत चालत आहे. ते या गणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय कोणत्याही कार्याला सुरूवात करीत नाही, असे राकेश खत्री यांनी 'लोकमत'ला सांगितले़
धामणगावात श्रद्धेला पावणारा उजव्या सोंडेचा गणपती
By admin | Updated: August 1, 2015 01:47 IST