(असायमेंट) अमरावती/ संदीप मानकर
एकदा वापर केलेल्या तेलाचा पुनर्वापर करणे हा अन्न सुरक्षा मानदे कायद्यानुसार गुन्हा ठरतो. असे असताना शहरातील अनेक हॉटेलमध्ये तसेच रस्त्यावरील हातगाड्यांवर तेलाचा सर्रास पुनर्वापर केला जात आहे. यामुळे असे पदार्थ खाणाऱ्यांना कर्करोगासारखे आजारही होऊ शकतात, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.
खाद्यपदार्थ तळताना त्या तेलाचा एक किंवा दोनदा वापर होणे अपेक्षित असताना वारंवार तेलाचा पुनर्वापर करून खाद्यपदार्थ तळून त्याची विक्री केली जात असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे.
बॉक्स
भेसळयुक्त पदार्थ विक्री केल्यास गुन्हा
कमी दर्जाच्या भेसळयुक्त अन्न पदार्थांची विक्री करणे किंवा खाद्यपदार्थ तळताना खाद्यतेलाचा वारंवार पुनर्वापर करणे हे अन्न व सुरक्षा कायद्यानुसार नियमबाह्य आहे. अशा पदार्थांची विक्री होत असेल तर एफडीएने कारवाई करणे अपेक्षित आहे.
बॉक्स:
रस्त्यावरील पदार्थ न खाल्लेलेच बरे
चटक-मटक पदार्थ आरोग्यासाठी ठरू शकतात घातक. चिभेचे चोचले पुरविण्यासाठी नागरिक रस्त्यावर उघड्यावर विक्री होणारे समोसे, कचोरी तसेच इतर पदार्थ आवडीने खातात. ते मोठ्या हॉटेलच्या तुलनेत स्वस्त मिळतात. मात्र, कमी दर्जाच्या तेलाचा वापर त्यात केला जातो. तेलाचा पुनर्वापर नियमानुसार करता येत नाही. परंतु, असे पदार्थ सेवन केल्याने पोटाचे विकार होतात. ॲसिडिटी तसेच हृदयासंबंधित आजार होतात. त्यामुळे असे पदार्थ न खाल्लेलेच बरे!
बॉक्स:
तेलाच्या पुनर्वापराने होऊ शकतो कॅन्सर
तेलामध्ये एकदा कोणताही पदार्थ तळला आणि त्यानंतर त्याच उरलेल्या तेलात दुसरा पदार्थ बनविले गेल्यास अशा तेलात फ्री रॅडिकल्स तयार होतात. हे रॅडिकल्स आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारशक्तींवर परिणाम करतात. अनेकदा या रॅडिकल्समुळे कर्करोग होण्याची शक्यता असते. एकदा वापरून झालेल्या तेलाचे पुन्हा-पुन्हा वापर केल्याने ॲथोरोस्कलॉरोसिस होऊ शकतो. ज्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढून धमन्या ब्लॉक होतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.
कोट
पुनर्वापर केलेल्या तेलात तळलेले पदार्थ सेवन केल्याने पोटाचे विकार वाढतात. कोलेस्ट्राॅल वाढल्याने हृदयासंबंधीचे आजार वाढण्याची शक्यता असते. तसेच भविष्यात कर्करोगसुद्धा होण्याची शक्यता असते.
- डॉ. राजेश मुंदे, हृदय व मधुमेह तज्ज्ञ
अमरावती