वरूड : वरूड - मोर्शी तालुक्यातील रुग्णांच्या उपचारासाठी व त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी मोर्शी-वरूडचे आमदार देवेंद्र भुयार यांनी पुढाकार घेतला आहे. ज्या गरिबांजवळ असाध्य रोगांवर उपचारासाठी पैसा नाही, अशा रुग्णांना मदत देण्यात येत आहे. तालुक्यामधील इसंब्री गावातील डोळ्याच्या कॅन्सरने पीडित दोन वर्षाच्या सिद्धांत युवनातेवर आमदारांच्या पुढाकाराने एल.व्ही. प्रसाद आय हॉस्पिटल हैद्राबाद येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. यातून सिद्धांतला दृष्टी मिळाली आहे.
वरुड तालुक्यातील इसंब्री येथील दोन वर्षांचा चिमुकला ''सिद्धांत युवनाते'' याच्या डोळ्यात कॅन्सरचे निदान झाल्यानंतर अमरावती येथील खासगी रुग्णालयात उपचार केले. परंतु एक वर्ष उपचार करूनही सुधारणा दिसत नसल्याने शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शस्त्रक्रियेकरिता ५ लक्ष रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले. काबाडकष्ट करून उदरनिर्वाह भागविणाऱ्या राजकुमार युवनाते यांच्यापुढे पैशाचा प्रश्न निर्माण झाला. सिद्धांतचे वडील राजकुमार युवनाते यांनी आ. भुयार यांच्याशी संपर्क साधून व्यथा मांडली. सिद्धांतचे घरी अठराविश्व दारिद्र्य, याची जाणीव असल्याने भुयार यांनी सिद्धांतचे घर गाठून माहिती जाणून घेतली. सिद्धांतला हैदराबाद येथील प्रसाद हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पाच लक्ष रुपयांचे डोळ्याच्या कॅन्सरची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी रुग्णसेवक राधेश्याम पैठणकर याचे विशेष सहकार्य लाभले.