अमरावती : लॉकडाऊनच्या काळात शहरात अवैध दारू विक्री आणि जुगार खेळाला उधाण आले आहे. शहर पोलिसांनी शनिवारी शहरातील चार जुगारांवर आणि तब्बल १२ अवैध दारू अड्ड्यांवर धाडी टाकल्या. यात चौदा आरोपींना अटक करून, त्यांच्या ताब्यातून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या घटनेमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. बडनेरा पोलिसांनी गांधी चौकातील मोकळ्या जागेत सुरू असणाऱ्या वरली-मटका अड्ड्यावर धाड टाकून वसंत सुखदेव बनसोड (४३ रा. अंजनगाव बारी) यांना अटक केली. गाडगेनगर पोलिसांनी मांडवा झोपडपट्टीतील धाड टाकून शेख आबीद शेख खालदी (३० रा. अलहिलाल कॉलनी) याला अटक केली. घटनास्थळाहून अशोक छाडू निखरे (४६ रा. लक्ष्मीनगर) हा पसार झाला. तसेच दुसऱ्या एका ठिकाणाहून सचिन राधेश्याम पातालबंशी (३८ रा. चिंचफैल) यालाही वरली-मटका व्यवसाय करताना ताब्यात घेतले. नागपुरी गेट पोलिसांनी पठाणपुरा स्थित कमेला ग्राऊन्ड परिसरातील वरली-मटका अड्ड्यावर धाड टाकून रवि गोविंदप्रसाद साहू (४० रा. मसानगंज) याच्याकडून ४ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणातील बाबाउद्दीन बद्रोद्दीन (रा. कमेला ग्राऊन्ड) हा आरोपी पसार झाला.
बॉक्स
दहा अवैध दारू विक्रेत्यांना अटक
बडनेरा पोलिसांनी शनिवारी आसरानगरातील सतीश रामचंद्र रयते या ताब्यातून ४६८ रुपयांची दारू जप्त केली. फ्रेजरपुरा पोलिसांनी परिहारपुऱ्यातील तीन महिलांकडून दारु जप्त केली. कुंभारवाडा येथे सोहन नगीन सुनेरे याच्याकडून दारू व दुचाकी असा एकूण ५८,९९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याचप्रमाणे रवि विश्वनाथ गडलिंग (२४ रा. राहुलनगर) याच्या ताब्यातून ५२० रुपयांची दारू जप्त केली. वलगाव पोलिसांनी राजू हरिदास अडबोल (रा. खारतळेगाव)कडून ७८० रुपयांची दारू जप्त केली. गाडगेनगर पोलिसांनी कुणाल अनिल साळुंखे (रा. विलासनगर) याच्याकडून ८०० रुपयांची दारू जप्त केली. नांदगाव पेठ पोलिसांनी महिलेच्या घरातून ५,३०० रुपयांची दारू जप्त केली. राजापेठ पोलिसांनी विक्की गजानन सोनोने (२२ रा. चिचफैल) कडून दुचाकी व दारू असा ४१,५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कोतवाली पोलिसांनी आकाश ऊर्फ अवली वसंत चव्हाण (२१ रा. हमालपुरा) आणि पंकज शिवलिंग हालोर (२९ रा. चिचफैल) यांच्या ताब्यातून ३२,२६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. भातकुली पोलिसांनी अतुल रामदास तांडेकर (३५ रा. गणोरी) याच्या ताब्यातून ७५० रुपयांची गावठी दारू जप्त केली.