अमरावती : ७० फूट विहिरीत पडलेल्या साडेचार वर्षाच्या मुलासह त्याला वाचविणाऱ्या पित्याचे रेस्क्यू करणाऱ्या अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांचा महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी सोमवारी सत्कार केला. महापालिकेसाठी ही बाब गौरवास्पद असल्याचे आयुक्त म्हणाले. यावेळी अग्निशमन विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
--------------------------
महापौरांनी केली भीमटेकडीची पाहणी
अमरावती : भीमटेकडी येथे महापालिकाद्वारे ध्यान केंद्र, प्रसाधनगृह, पिण्याचे पाण्याची व्यवस्था, पर्यटन निवास, स्वागत कक्ष तसेच मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आलेले आहे. या कामांची सद्यस्थिती काय आहे, हे पाहण्याकरीता महापौर चेतन गावंडे यांनी सोमवारी पाहणी दौरा केला. यावेळी अजय गोंडाणे, प्रणित सोनी, उपायुक्त सुरेश पाटील सोबत होते.
------------------------------
नागरी अंगणवाडी मदतनिसांना मिळणार न्याय
अमरावती : एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत नागरी क्षेत्रातील अंगणवाडी मदतनिसांना न्याय देण्यासाठी पदोन्नतीच्या अटी व शर्तींमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने अटी व शर्तींची योग्य पडताळणी करून सुधारणा प्रस्ताव तात्काळ सादर करावा, असे निर्देश महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी यंत्रणेला दिले.
---------------------
बोर्डी नाला मध्यम प्रकल्पाच्या कामांना गती
अमरावती : चांदूर बाजार तालुक्यातील बोर्डी नाला मध्यम प्रकल्पासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता व पर्यावरण मान्यता प्राप्त झाल्या आहेत. बोरगाव मोहणा गावालगत बांधकाम सुरू असलेल्या या प्रकल्पाची घळभरणी ना. बच्चू कडू यांच्या हस्ते झाली. यावेळी सरपंच अमोल ठाकरे यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
----------------------------------------
जिल्ह्यात सद्यस्थितीत ४,३४७ ॲक्टिव्ह रुग्ण
अमरावती : जिल्ह्यात सद्यस्थितीत ४,३४७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी १,०३६ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. याशिवाय महापालिका क्षेत्रात १,८३७ व ग्रामीणमध्ये १,४७५ रुग्ण ‘होम आयसोलेशन’मध्ये असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
------------------
प्रभागांमध्ये पुन्हा कचऱ्याचे ढीग
अमरावती : स्वच्छता कंत्राटदारांद्वारे नियमितपणे स्वच्छता केली जात नसल्याने बहुतेक प्रभागांमध्ये कचऱ्याचे ढीग लागले आहेत. महापालिका प्रशासनाचे याकडे लक्ष नाही. नाल्यांचीही नियमित सफाई केली जात नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.