अध्यक्षांसह १६ जणांचा समावेश, विधानसभा, विधान परिषद सदस्यांची नामनियुक्ती
अमरावती : आदिवासी समाजासाठीच्या योजना, उपक्रम, शिक्षण, निधीचे वितरण आदी बाबींवर अंकुश ठेवण्यासाठी विधिमंडळाद्वारा गठित अनुसूचित जमाती कल्याण समितीवर १६ आमदारांची नामनियुक्ती करण्यात आली आहे. कोरोना संसर्गामुळे रखडलेल्या या समितीवर विधानसभा, विधान परिषदेच्या सदस्यांची वर्णी लागली आहे.
अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष दौलत दरोडा हे आहेत. सदस्य म्हणून श्रीनिवास वनगा, महेंद्र दळवी, अनिल पाटील, शिरीष चौधरी, साहसराम कोरोटे, अशोक उईके, तुषार राठोड, राजेश पाडवी, भीमराव केराम, राजकुमार पटेल,
दिवाकर रावते, अमरनाथ राजूरकर, रमेशदादा पाटील, किरण सरनाईक हे आमदार असणार आहेत.
-------------------
बनावट आदिवासींची नियुक्ती, नवीन भरतीप्रक्रियेवर भर
अनुसूचित जमाती कल्याण समिती राज्यभर दौरे करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनात विविध जागांवर बनावट आदिवासींची असलेली नियुक्त रद्द करण्याचे निर्देश असताना काही ठिकाणी निरंक दाखविण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याअनुषंगाने बनावट आदिवासींची नियुक्ती, नवीन भरतीप्रक्रियेवर भर दिला जाईल. तसेच बनावट आदिवासींची नियुक्ती रद्द करण्यासाठी समिती पुढाकार घेईल, असे नवनियुक्त अध्यक्ष दौलत दरोडा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.