वाठोडा शुक्लेश्वर : भातकुली तालुक्यातील नांदेड बु., वडाळा शिंगणापूर येथील शेतकऱ्यांच्या शेती पंपाचा वीज पुरवठा वीज बिलासाठी, चार महिन्यांपासून खंडित केल्यामुळे खरीप हंगामात पावसाने चाट दिल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने शेतकर्यांचा जादा अंत न पाहता खंडित केलेला वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी शेतकर्यांकडून केली जात आहे. वीज पुरवठा सुरू करण्यासंदर्भात शेतकऱ्यांनी विद्युत अभियंता यांना निवेदन देऊन शेतीपंपाची लाईन सुरू करण्यासंदर्भात विनंती केली आहे.
विद्युत पुरवठा चार महिन्यांपासून खंडित करण्यात आला आहे. यासंदर्भात विद्युत कर्मचारी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, जोपर्यंत वीजबिलाचा भरणा करणार नाही तोपर्यंत वीज पुरवठा चालू करू नका, असे आम्हाला वरिष्ठांचे व मंत्रालयातून आदेश आहेत. आम्ही शेतकरी वीज बिलाचा भरणा महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाने दिलेल्या सवलतीनुसार येणार्या हंगामात म्हणजे जानेवारी महिन्यात भरण्यास तयार आहोत. त्यामुळे महावितरण कंपनीने वीज पुरवठा सुरळीत करून शेतकऱ्यांना आधार द्यावा, अशा आशयाचे निवेदन राजेश बोबडे, सुरेश काळे, सुधाकर सोनार, श्रीराम कळसकर, विनायक गव्हाणे, डॉ. सुरेश खरडे, जयप्रकाश इंगळे, संतोष बुध, सुधाकर खोडके, अनुसयाबाई भुसारी, पुरुषोत्तम भुसारी, अंबादास कंटाळे, राजेश ढोलवाडे, बबलू ढोलवाडे, शंकर रामाघरे, शालिकराम बुसे, पंजाबराव रामा घटे, रियाजून बेग, शराफत बेग, जालीम बेग, अनसार बेग, राजिक बेग, तौसिफ बेग, मुजजर बेग, संजय कोरडे, जितेंद्र धुमाळे, गजानन गव्हाणे आदी शेतकऱ्यांच्या सह्यानिशी देण्यात आले.
त्यामुळे महावितरण कंपनीने शेतकर्यांचा जादा अंत न पाहता खंडित केलेला वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी शेतकर्यांकडून निवेदन देऊन करण्यात आली आहे.