अमरावती : अनुदानित शाळांमध्ये शिपाई पदे कायमचे बंद होणार आहेत. आता विद्यार्थिसंख्येनुसार प्रतिशाळा शिपाई भत्ता लागू केला जाणार आहे. त्यामुळे नाईक, पहारेकरी, रात्रीचा पहारेकरी, सफाई कामगार, हमाल, परिचर, चौकीदार, प्रयोगशाळा परिचर या पदांवरील कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर ही पदे संपुष्टात येतील, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
राज्यातील सर्व खासगी, अनुदानित, अंशत: अनुदानित, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना यापुढे सुधारित आकृतिबंध लागू करण्याऐवजी विद्यार्थिसंख्येनुसार प्रतिशाळा शिपाई भत्ता लागू करण्यात येणार आहे. यासंदर्भात ११ डिसेंबर २०२० रोजी शासननिर्णय निर्गमित करण्यात आला आहे. प्रत्येक शाळेत किती विद्यार्थिसंख्या असल्यास किती शिपाई (आकृतिबंध अपेक्षित चतुर्थश्रेणी पदे) लागू राहतील, त्यांची संख्या, त्यांना मुंबई, पुणे यांसारख्या शहरांत, ग्रामीण भागात किती भत्ता दिला जाईल, याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या शाळांमध्ये सद्यस्थितीत एकही चतुर्थश्रेणी पद कार्यरत नाही, तेथे आकृतिबंध लागू असणार आहे. जेथे कर्मचारी कार्यरत आहे, तिथे रिक्त असलेल्या पदांच्या प्रमाणात शिपाई भत्ता लागू राहणार आहे. या नव्या आकृतिबंधामुळे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष धुमसत असल्याचे दिसून येत आहे.
-----------------
जिल्ह्यातील माध्यमिक शाळा - ४७३
एकूण पदे - ९५०
सध्या नोकरीवर असलेले शिपाई- ६३५
शिपायाच्या रिक्त जागा- ३१५
---------------------
शिक्षक परिषदेचा विरोध
१) प्रतिशाळा महिना शिपाई भत्ता लागू राहणार, असे सांगून विभागाने देण्यात येणारा भत्ता प्रतिशिपाई लागू असेल की नाही, याबाबत स्पष्ट केले नाही. सोबतच जेथे एक हजार विद्यार्थी आहेत, तेथे केवळ पाच शिपाई कसे सेवा पुरवू शकतील, यावर शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
२) प्रशासकीय कामांसाठी बाहेर फिरणे, शाळेची साफसफाई करणे, प्रयोगशाळेतील गोष्टींकडे लक्ष देणे, शिवाय शाळा दोन सत्रांत असल्यास केवळ तीन शिपाई कुठे आणि कसे काम पाहतील. असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी संघटनांनी शाळा बंद ठेवून निवेदनाद्वारे शासनाचे लक्ष वेधले आहे.
३) अध्ययन-अध्यापन साहाय्यात आधार असलेले चतुर्थश्रेणी कर्मचारी मानधनावर काम करायला लागले, तर चांगले कर्मचारी मिळणार नाहीत. विशेष म्हणजे, कमीत कमी चार शिपाई शाळेत असताना, ती संख्या दोनवर आणल्याने अतिरिक्त शिपाई वाढणार आहेत. थोडक्यात नवीन भरती पुढे १० वर्षे होणार नाही.
---------
कोट
आधीच शिपाई, सफाई कामांसाठी माणसे मिळत नाहीत. भरती बंद केल्यास शाळा व्यवस्थापनावर परिणाम होईल. कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नेमावे लागतील. कामे कशी करावी, स्वच्छतेचा प्रश्न उपस्थित होणार आहे. मोठी समस्या उदभवणार आहे.
- शरद अग्रवाल, धामणगाव रेल्वे
--------------
कोट
अनेक वर्षांपासून शिपाई पदभरती केलेली नाही. त्यामुळे शाळा कशी चालवायची, हा गंभीर प्रश्न आहे. तोकड्या मानधनावर सर्व कामे कोण करणार, याचा शासनाने विचार करावा. शासनाची नवी नियमावली शाळा चालविणे कठीण होणार आहे.
- मधुकर अभ्यंकर, अमरावती.
कोट
शासनादेशाप्रमाणे कार्यवाही केली जाणार आहे. चतुर्थश्रेणी पदाची भरती आता होणार नाही, हे आदेशात स्पष्ट झाले आहे. शिपाईसाठी शाळांंना विद्यार्थिसंख्येनुसार भत्ता मिळेल.
- तेजराव काळे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), अमरावती.