लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य परिवहन महामंडळाच्या सर्वच संपकरी कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. यामुळे बससेवाही पूर्वपदावर आली आहे. पाच महिन्यांपासून ही बस बंद असल्याने बसचा मेंटेनन्स निघत आहे. त्यामुळे सर्वच बस धावत नाहीत, शिवाय उकाडा वाढल्याने प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. परिणामी बसेसच्या फेऱ्याही कमीच आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्याच्या हाताला काम नसल्याने त्या दिवसाचा दामही मिळत नाही. बसेस पाच महिन्यांपासून आगारातच थांबून असल्याने मेंटेनन्सचे काम सुरू होते. त्यामुळे एप्रिल महिन्यात अनेक जणांच्या हाताला काम मिळाले नाही. एसटीमध्ये काम नाही, तर दाम नाही, अशी पद्धत असल्याने काहींना संप मिटला तरी काम मिळत नाही.
निम्म्या कर्मचाऱ्यांना मिळतो रोज काम
- अमरावती विभागातील अमरावती, बडनेरा, दर्यापूर, परतवाडा, चांदूर बाजार, मोर्शी, वरूड, चांदूर रेल्वे या आठ आगारांमध्ये जवळपास २३०० कर्मचारी आहेत.- न्यायालयाच्या आदेशानंतर सर्वच कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. कर्मचारी कामावर हजर झाल्याने बसही धावू लागल्या आहेत. मात्र, बसचे काम निघत असल्याने काहींना काम मिळत नव्हते.
एसटी कर्मचारी संघटना म्हणतात....
संपामुळे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही. आता संप मिटला अन् कर्मचारी कामावर आले. कामावर हजर असताना त्यांना ड्युटी मिळाली नाही, तर वेतन दिले जात नाही. कर्तव्यावर हजर झाल्यास वेतन मिळावे.- बाळासाहेब राणे, प्रादेशिक सहसचिव, एसटी कामगार सेना
पाच महिन्यांपासून संपामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन नाही. यामुळे आर्थिक संकटात कर्मचारी सापडले होते. आता संप मिटला आहे. कर्मचारी कामावर परतले आहेत. परंतु कामावर आल्यावर काम मिळाले नाही, तर वेतन मिळत नाही. ते द्यावे. - मोहित देशमुख, विभागीय सचिव, एसटी कामगार संघटना