नितीन राऊत यांचे प्रतिपादन : विद्यापीठात केमिकल इंजिनीअरिंगची कार्यशाळाअमरावती : जगात औद्योगिकिकरणाचा वेग वाढत असून त्या संधीचा फायदा केमिकल अभियंत्यांना व्हावा, त्यामुळे त्यांनी स्वत:मध्ये अद्ययावत आणि नावीन्यपूर्ण कौशल्य विकसित करावे असे आवाहानात्मक प्रतिपादन ओमान येथील सोहर विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक नितीन राऊत यांनी केले.विद्यापीठातील केमिकल टेक्नॉलॉजी विभागाच्यावतीने केमिकल इंजिनिअरिंग अॅण्ड फ्युचर प्रॉस्पेक्ट्स ग्लोबली या विषयावर व्याख्यानाचे आयोजन पार पडले. त्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून नितीन राऊत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. पुढे बोलताना राऊत म्हणाले मी स्वत: विद्यापीठातील केमिकल टेक्नॉलॉजी विभागाचा विद्यार्थी असून विभाग प्रमुख विलास सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आचार्य पदवीसाठी संशोधन केले आहे. सद्या ओमान या देशात कार्यरत असल्याचा मला अभिमान आहे. विद्यार्थ्यांनी अद्ययावत कौशल्य आत्मसात करून परीणामकारक सादरीकरण होण्यासाठी उत्तोमोत्तम संवादशैली व लेखनशैली विकसित करावी. इंजिनिअरिंग विषयातील अद्ययावत ज्ञान आत्मसात करून जागतिकस्तरावर केमिकल उद्योगामध्ये असलेल्या रोजगाराच्या संधी प्राप्त कराव्यात. आणि त्यासाठी स्वत:ला परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करावा यावर डॉ. राऊत यांनी आपल्या मार्गदर्शनात भर दिला. विद्यार्थ्यांनी आपले करीअर घडवित असतांना आत्मसात करावयाच्या बाबींवर त्यांनी यावेळी प्रकाश टाकला. अध्यक्षस्थानावरून बोलतांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा बायोटेक्नॉलॉजी विभाग प्रमुख व्ही.एस. सपकाळ अध्यक्षीय भाषणात म्हणाले.विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान अद्ययावत करण्याची गरज असून जागतिकस्तरावर असणा-या संधी मिळविण्यासाठी त्यादृष्टीने स्वत:ला सदैव तयार ठेवावे. केमिकल उद्योगाची गरज पूर्ण होवू शकेल असे अद्ययावत ज्ञान वाढवावे यावर त्यांनी भर दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी नितीन राऊत यांच्याशी प्रत्यक्ष संवाद करून आणि प्रश्न विचारून आपल्या समस्यांवर उत्तरे मिळविली. यावेळी बी.टेक. अभ्यासक्रमाचे मोठज प्रमाणावर विद्यार्थी उपस्थित होते. बी.सी. यु.डी. चे संचालक आर.एस. सपकाळ यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रशांत शिंगवेकर यांनी केले. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांना केमिकल उद्योगात रोजगारांच्या संधी
By admin | Updated: July 19, 2015 00:12 IST