पान २ फोटो पी ११ टवलार
परतवाडा : अचलपूर तालुक्यातील टवलार ग्रामपंचायतीत विकासकामे न करताच शासनाच्या निधीचा अपहार केल्याची तक्रार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने बीडीओंकडे करण्यात आली आहे. पाच हजारांच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या टवलार ग्रामपंचायतीत सन २०१६ पासून करण्यात आलेली कामे व खर्च झालेला निधी यात प्रचंड तफावत असल्याचे रायुकाँचे तालुकाध्यक्ष तोशल चित्रकार यांनी तक्रारीत म्हटले आहे.
ग्रामपंचायती अंतर्गत झालेल्या संपूर्ण कामाची तपासणी करून संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाईची मागणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायती अंतर्गत कोरोना काळात गावात विविध ठिकाणी नागरिकांना हात धुण्यासाठी सॅनिटायझर वजा हॅन्डवॉश स्टेशन उभारणीसाठी दीड लक्ष रुपयांचा खर्च केल्याचे दाखविण्यात आले आहे. प्रत्यक्षात गावात कुठेच अशी व्यवस्था करण्यात आलेली नसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे गप्पी मासे केंद्रसुद्धा कागदावरच उभारून शासकीय रक्कम संबंधित सचिव आदींनी काढल्याचे म्हटले आहे. २१ डिसेंबरपर्यंत संबंधितांवर योग्य कारवाई करावी, अन्यथा २२ डिसेंबरपासून उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.