अमरावती : इयत्ता अकरावी ऑनलाईन तिसऱ्या प्रवेश फेरीला गुरुवार, १० डिसेंबरपासून प्रारंभ झाला. १२ डिसेंबरपर्यंत पसंती कॉलेजसाठी नोंदणी करावी लागणार आहे. १५ डिसेंबर रोजी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार असून, १५ ते १८ असे चार दिवस पसंती कॉलेजमध्ये रिक्त जागांवर प्रवेश घ्यावा लागेल, अशी माहिती केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीचे सदस्य अरविंद मंगळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
अमरावती महानगरासाठी अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. यापूर्वी पहिली, दुसरी आता तिसरी फेरी सुरू झाली आहे. मध्यंतरी मराठा आरक्षणामुळे अकरावी प्रवेशाची प्रक्रिय स्थगित करण्यात आली होती. मात्र, शासनाने विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ईसीबीसी वगळता अन्य प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १ डिसेंबरपासून नव्याने प्रवेश फेरी राबविली जात आहे. दुसरी प्रवेश फेरी बुधवारी आटोपली आहे. आता तिसऱ्या प्रवेश फेरीची प्रक्रिया राबविण्यास प्रारंभ झाला आहे. दुसऱ्या फेरीपर्यंत कला शाखेत ३३७५ क्षमतेपैकी १५९२ प्रवेश झाले आहे. वाणिज्य शाखेत २४२५ क्षमेतेपैकी १२८९ प्रवेश करण्यात आले आहे. विज्ञान शाखेत ६५४० प्रवेश क्षमतेपैकी ३७८१ प्रवेश निश्चत झाले आहे. एमसीव्हीसीत ३०२० क्षमतेपैकी ६६२ प्रवेश झाले आहेत. तिसऱ्या फेरीतील विशेष प्रवेश फेरीचे आयोजन १८ डिसेंबरनंतर वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.
----------------------
तिसऱ्या फेरीत शाखानिहाय रिक्त जागा
कला- १७८३
वाणिज्य- ११३६
विज्ञान- २७५९
एमसीव्हीसी- २३५८