मोर्शी : संभाव्य नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या जातवैधता प्रमाणपत्राच्या वैधतेसंदर्भात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेची सुनावणी १० सप्टेंबरला होणार आहे. नगराध्यक्षांच्या निवडणुकीवर स्थगनादेश न्यायालयाने दिलेला नसल्यामुळे १६ आॅगस्टला नगराध्यक्षाची निवडणूक निर्धारित कार्यक्रमानुसार होणार आहे.सलग चौथ्यांदा नगराध्यक्षपद महिलेकरीता आरक्षित करण्यात आल्याच्या विरोधात येथील राकाँ नगरसेवक प्रदीप कुऱ्हाडे यांनी उच्चन्यायालयात याचिका दाखल केली होती. पुढे त्यांनी ही याचिका परत घेतल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. या निवडणुकीकरीता अशोक रोडे गटाच्या प्रतिभा कटीस्कर यांच्या बाजूने ११ नगरसेवक तर विरोधी गटातील वंदना बोरकर यांच्या बाजूने ८ नगरसेवक असल्याचे चित्र आहे. नगराध्यक्षपद अनूसूचित जाती महिला प्रवर्गाकरीता आरक्षित आहे. दरम्यान नगर सेविका वंदना बोरकर यांनी प्रतिभा कटीस्कर यांच्या जातवैधता प्रमाणपत्राला उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन आव्हान दिले असून कटीस्कर यांना दिलेले जात वैधता प्रमाणपत्र हे चुकीचे असल्याचा त्यांचा दावा आहे. नागपूर उच्च न्यायालयात १३ आॅगस्टला जातवैधता प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने १६ आॅगस्टला निर्णयातील अटीच्या अधिन राहून घेण्यास परवानगी दिलेली आहे. (तालुका प्रतिनिधी)
मोर्शी नगराध्यक्षपदाची निवडणूक शनिवारी
By admin | Updated: August 14, 2014 23:28 IST