मंगळवारी होणार निकाल जाहीर : खंडेलवाल ज्वेलर्स दरोडा प्रकरणअमरावती : शहरातील बहुचर्चित खंडेलवाल ज्वेलर्स दरोडाप्रकरणी आठ दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा सिद्ध झाला आहे. त्यांना काय शिक्षा द्यायची याचा महत्त्वपूर्ण निकाल मंगळवारी जाहीर करण्यात येणार आहे. जन्या ऊर्फ जनार्धन रामराव वाघमारे (२७), अंजली ऊर्फ भारती जनार्धन वाघमारे (२६, दोन्ही रा. भांडेगाव, हिंगोली), रफीक शेख नबी शेख ऊर्फ शेखर प्रकाश पाटील ऊर्फ रॉबर्ट जॉन डीसोजा (३८, रा. मारुती नगर, ता.राणे बेन्नुर, जि.हवेरी, कर्नाटक), ओमप्रकाश ऊर्फ ओम्या भारत भटकर (२५, रा. भागीरथ वाडी, जुना वाशीम), दिलीप ऊर्फ काल्या किसन वाघ (३१, रा. सुलतानपुरा, मोर्शी), नसरीन बानो रफीक शेख (३२, रा. गांधीनगर, ता. हरीहर, जि. दाबनगिरी), तान्या ऊर्फ तानाजी विठ्ठल भोसले ऊर्फ भोळे (३५,रा. बोरखडी, हिंगोली) या आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध झाला आहे. दिलीप ऊर्फ दिल्या रामराव कोरडे (३०,रा. भांडेगाव ,ता. सेंधगाव जि. हिंगोली), शिवाजी विठ्ठ्ल भोसले ऊर्फ भोळे (२८,रा. बोरखडीता. शेंदगाव, हिंगोली) व शेख सलीम शेख फरीद (३९,रा. गयबीपुरा, रिसोड) यांच्याविरुद्ध कुठलेही ठोस पुरावे न मिळाल्याने न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटका केली.जयस्तंभ चौकातील खंडेलवाल ज्वेलर्स प्रतिष्ठानात दरोडेखोरांनी ३१ आॅगस्ट २०१० रोजी दरोडा घालून बंदुकीच्या धाकावर २७ लाखांचा ऐवज चोरुन नेला होता. या घटनेचा तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यामार्गदर्शनात पोलिसांनी तपास करुन दरोडेखोरांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी दरोड्यासह महाराष्ट्र गुन्हेगार संघटित कायद्यांतर्गत कारवाई केली. घटनेचे दोषारोपत्र पोलिसांनी ४ मार्च रोजी येथील मकोकाचे विशेष न्यायधीश स. शी. दास यांच्या न्यायालयात दाखल केले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आठ आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध झाला आहे. उर्वरित तिघांची निर्दोष सुटका करण्यात आली. गुन्हा सिद्ध झालेल्या आरोपींना काय शिक्षा होणार याचा निकाल मंगळवारी जाहीर होणार असल्याची माहिती विधी सूत्रांनी दिली आहे. याप्रकरणी सरकारी पक्षाकडून वकील विवेक काळे व अमर देशमुख यांनी प्रभावी युक्तिवाद केला. (प्रतिनिधी)
आठ आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध, तिघे निर्दोष
By admin | Updated: August 4, 2014 23:30 IST