वरुड : मंगळवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास वरुडसह तालुक्यात काही भागात वादळी पावसासह पाऊस पडला. १५ मिनिटांच्या पावसामुळे काही वृक्ष कोलमडून पडले. शहापूरनजीक वडवृक्ष कोलमडल्याने तब्बल चार तास वाहतूक खोळंबली होती. काही गावात घरावरची छप्परेही उडाली. वरुडसह तालुक्यात मंगळवारी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान अचानक वादळी पावसाला सुरुवात झाली. यामध्ये अनेक झाडे उन्मळून पडली. शहापूरनजिक रस्त्यावर असलेले महाकाय वडाचे झाड कोलमडून पडल्याने काहीकाळ वाहतूक खोळंबली होती. तब्बल चार तास वाहतूक खोळंबल्याने प्रवाशासह वाहतूकदारांना त्रास सहन करावा लागला. वरूडचे ठाणेदार अर्जुन ठोसरे, उपनिरीक्षक रवींद्र मस्कर, भूषण अवघड यांच्यासह वरुड पोलीस घटनास्थळावर जाऊन रस्त्यावरील कोसळलेले झाड हटविले. त्यानंतर वाहतूक झाली. वाहनचालकांनी जागा मिळेल तेथून वाहने काढली. अमरावती, परतवाडा, मोर्शी जाणारी वाहतूक खोळंबल्याने अनेक प्रवाशांना वरुडलाच थांबावे लागले तर वाहनाची मोठी रांगच रांग लागली होती. मंगळवारी अचानक झाल्या वादळी पावसामुळे तापमानामध्ये ेकाही प्रमाणात घट झाली. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. अवकाळी वादळी पावसामुळे टेंभूरखेडा, गव्हाणकुंड, झटामझिरी, जरुडसह आदी गावांतील घरावरील छत उडाले. वृत्त लिहिस्तोवर काही प्रमाणात वित्तहानी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. (तालुका प्रतिनीधी)
अवकाळी पाऊस, झाड पडल्याने वाहतूक खोळंबली
By admin | Updated: May 13, 2015 00:16 IST