पूर्णेचा प्रकोप : दोन्ही विभागांतील समन्वयाच्या अभावाने घातली भरसुमित हरकुट - चांदूरबाजारतालुक्यातील मध्यम पूर्णा प्रकल्पाद्वारे सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे तालुक्यातील १५०० कुटुंबांना झळ पोहचली. यात आर्थिकच नव्हे तर जीवितहानीसुद्धा झाली. घडलेल्या या प्रलयंकारी घटनेला जबाबदार कोण हा प्रश्न अधांतरीतच आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांचा एकमेकावरील आरोप-प्रत्यारोप पाहता ही घटना प्रशासनाचा आपसातील समन्वयाअभावी घडली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. जलप्रलयाला मध्यम पूर्णा प्रकल्पाचे अधिकारीच दोषी असल्याची चर्चा आहे. असे असताना पूर्णा प्रकल्पात सर्वप्रथम जलसाठा येत असतानाच या प्रकल्पावर अत्याधुनिक संगणकीय प्रणाली बसविण्यात आली होती. या प्रणालीमुळे मध्यप्रदेशात असलेल्या भैसदेही येथील नदीच्या उगमस्थानी व सावलमेंढा या ठिकाणी बसविण्यात आलेल्या सेंसरमुळे पडलेला पाऊस व नदीपात्रातून धरणात वाहत येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाची नोंद संगणकावर क्षणात दिसत होती. किती पाणी सोडायचे? पाण्याची पातळी किती? मीटर ठेवायची माहितीही हे संगणक लावताच मिळत होती. कंत्राटाचे नूतनीकरण रखडल्याने गोंधळधरणातील साठा मर्यादीत ठेवण्यात या प्रणालीचा फार मोठा आधार प्रकल्प अधिकाऱ्यांना मिळत होता. परंतु मागील दोन पावसाळ्यापासून हे संगणकीय प्रणाली बंद पडलेली आहे. या अत्याधुनिक संगणकीय प्रणालीचा चालविण्याचा कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात आला होता. मात्र जून २०१३ मध्ये या कंत्राटदाराचा कंत्राटाचे नुतनीकरणाचा प्रस्ताव रखडल्याने ही प्रणाली बंद पडलेली आहे. पूर्णा प्रकल्पावरील या संगणकीय प्रणाली देखरेखीचा खर्च वर्षाकाठी १२ लक्ष रूपये असून गेल्या वर्षभरापासून हा प्रस्ताव मंत्रालयात धुळखात आहे. महाराष्ट्रातील एकूण ७ प्रकल्पावरील ही प्रणाली बंद असून ही प्रणाली जनप्रतिनिधीच्या उदासीनतेमुळे रखडलेली आहे. पूर्णा प्रकल्पाकडे टेलिफोन तसेच वायरलेस सेवा सुद्धा नसून या धरणाला मध्यप्रदेशातील होणाऱ्या पावसाची सोबतच धरणात वाहुन येणाऱ्या पाण्याची माहिती मिळण्याची कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. प्रकल्पावरील अधिकारी, कर्मचारी, गुदगाव, सावलमेंढा येथील आदिवासी नागरिकांना वारंवार मोबाईलवरून संपर्क साधून पाण्याच्या पातळीवर नियंत्रण ठेवतात. सोबतच या विभागाकडे काही महत्वाची यंत्रणा अथवा दुरूस्ती करण्याकरिता निधीची उपलब्धता नसल्याने हा विभाग पांगळा झाला असल्याचे दिसते. सदर घटना घडली त्या दिवशी पूर्णा प्रकल्पातील अभियंताने तालुकास्तरीय पूर नियंत्रण कक्षाला व स्थानिक पोलीस स्टेशनला सकाळी ८.११ वाजता पाळी सोडण्याचा पहिला संदेश कळविला. त्यानंतर लगेच स्थानिक तहसीलदार यांना सुद्धा कळविले. जिल्हा पूर नियंत्रण कक्ष व जिल्हाधिकारी कार्यालयाला ९.४० ते ९.५३ या दरम्यान कळविले. तसेच सकाळी ९.५६ वाजता प्रकल्प अभियंताने ब्राम्हणवाडा (थडी) येथील गंगामाय संस्थान येथे मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जाणार असल्याची माहिती दिली असल्याबाबत संबंधित अधिकाऱ्याकडून कळले. धरणात जुलै अखेरपर्यंत ६५ ते ६८ टक्के जलसाठा ठेवण्याचा नियम असताना सुद्धा घटनेच्या दिवशी धरणात ८० टक्के जलसाठा पूर्वीच होता व मध्यप्रदेशात रात्री ४ नंतर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धरणात पाण्याची पातळी सकाळी ८ वाजतानंतर अचानक वाढू लागल्याने धरणाचे २ गेट ५० सें. मी. उघडण्यात आले. त्यानंतर १०.३० वाजताच्या सुमारास पाण्याची पातळी वाढतच असल्याने धरणाचे ५ गेट ५० सें. मी. उघडण्यात आले तेव्हा धरणात ४५१.१५ मीटर पाणी होते. त्यामुळे सकाळी ११ वाजता धरणाचे ९ ही दरवाजे २ मीटर उघडण्यात आले तेव्हा धरणात ४५१.५५ मीटर पाणी होते. अखेर पाण्याची पातळी कमी होत नसल्याचे दिसताच वरिष्ठांचा आदेशानुसार धरणाचे ९ दरवाजे ३ मीटर उघडण्यात आले. धरणाने ४५१.९८ मिटरची पातळी गाठली होती. पूर्णा प्रकल्पात ४५२ मीटर ही धोक्याची पातळी असून यामुळे धरणाला तडा जाऊन धरण फुटण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली.
नादुरुस्त संगणकीय प्रणालीमुळे घात
By admin | Updated: August 2, 2014 23:50 IST