अमरावती : मित्राकडून व्याजाने पैसे काढून देतो, असे सांगून पाण्यातून गुंगीचे औषध देऊन डॉक्टरने विवाहित महिलेवर कारमध्ये अत्याचार केला. ही घटना चांदूर रेल्वे मार्गावर एसआरपीएफ क्वार्टरनजीक ७ डिसेंबर रोजी रात्री १०.३० च्या सुमारास घडली. डॉक्टरविरुद्ध फ्रेजरपुरा पोलिसांनी बुधवारी गुन्हा नोंदवून गुरुवारी दुपारी त्या नराधमाला अटक केली. शुक्रवारी त्याला न्यायालयासमोर हजर करून पोलीस पीसीआर मागणार आहे.
पोलीससूत्रानुसार, डॉ. लच्छुराम जाधवानी (४८, रा. ताजनगर) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादीचे फॅमिली डॉक्टर असल्याने त्याला महिलेची आर्थिक स्थिती माहिती होती. महिलेला बरे नसल्याने सोमवारी ती रात्री रुग्णालयात आली. रक्तदाब वाढल्याचे डॉक्टरने सांगितले. कशाची चिंता आहे, अशी विचारणा केली. मुलीच्या शिकवणी वर्गाचे पैसे द्यायचे आहेत, असे सांगताच डॉक्टरने, मित्र व्याजाने पैसे देतो, त्याकरिता कॅम्प परिसरात यावे लागेल, असे सांगून डॉक्टरने तिला कारमध्ये बसविले. नास्ता दिला. त्यानंतर बाटलीतून पाणी पाजले. महिलेला गुंगी आल्यानंतर चांदूर रेल्वे मार्गावर अंधारात कार थांबवून मागच्या सीटवर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती.