अमरावती : जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात विकास कामांसाठी मिळणारा आमदार निधी खर्च करण्यात अमरावती जिल्हा सरस ठरला आहे. मागील वर्षीचीही २ कोटी रुपयांच्या आमदार निधीपेक्षा मंजूर केलेली जास्त कामे मार्गी लावण्यात आठही आमदार यशस्वी ठरले. विधानसभेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वच आमदारांना दरवर्षी शासनाकडून स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत दोन कोटींचा निधी मंजूर केला जातो. यामधून रस्ते, समाज भवन, व्यायाम शाळा, पाणीपुरवठा योजना यासारखी विविध विकास कामे आमदार निधीच्या माध्यमातून केली जातात. जिल्हा नियोजन विभागाकडे मागील दोन वर्षांत जिल्ह्यातील आठही आमदारांनी शासनाकडून मिळालेला दोन कोटींचा निधी मुदतपूर्व खर्च करून त्यापेक्षाही अधिक विकास कामे करण्यासाठी नियोजन विभागाकडे प्रस्ताव सादर केले होते. त्यामुळे प्रशासकीय मंजूरी मिळालेली ही कामे मार्गी लावण्यात आमदारांना यश मिळाल्याचे जिल्हा नियोजन विभागाने दिलेल्या आकडेवारीतून दिसून आले. अमरावती विभागात आमदारांमध्ये अमरावती जिल्ह्यातील सर्व आठ आमदारांनी शासनाचा निधी खर्च करण्यात यश मिळविले. स्थानिक विकास कार्यक्रमासाठी अकोला जिल्ह्यातील आमदारांना मिळालेला निधी विहित मुदतीत खर्च न झाल्यामुळे सुमारे ३.५० कोटी रुपये शासनाकडे परत पाठविण्याची नामुश्की या जिल्ह्यावर आली.अमरावती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व आमदार रावसाहेब शेखावत करीत आहेत. त्यांनी सन २०१३-१४ मध्ये दोन कोटींची कामे पूर्ण करून यावरही ६०.६४ लाखांचे अतिरिक्त कामे केली आहेत. तर सन २०१४-१५च्या आर्थिक वर्षात त्यांनी शासनाकडून मिळणाऱ्या दोन कोटी रुपयांच्या विकास कामामध्ये नियोजन विभागाला प्राप्त झालेल्या पहिल्या हप्त्त्यातील ६६.६६ लाख रुपयांची कामे मार्गी लावली आहेत. उर्वरित निधीतही त्यांनी विकासकामे प्रस्तावित करून त्यांनाही प्रशासकीय मंजूरात मिळविली आहे. बडनेराचे आमदार रवी राणा यांनी सन २०१३-१४ मध्ये दोन कोटींची कामे पूर्ण करून ६१.५० लाखांची अतिरिक्त कामे केली आहेत. सन २०१४-१५च्या आर्थिक वर्षात त्यांनी शासनाकडून मिळणाऱ्या दोन कोटी रुपयांच्या विकास कामांमध्ये नियोजन विभागाला प्राप्त झालेल्या पहिल्या हप्त्त्यातील ६६.६६ लाख रुपयांची कामे मार्गी लावली आहेत. तर उर्वरित निधीतही त्यांनी विकासकामे प्रस्तावित करून प्रशासकीय मंजूरात मिळविली आहे. तिवसा मतदारसंघाचे आमदार म्हणून यशोमती ठाकुर या प्रतिनिधीत्व करीत आहेत. त्यांनी सन २०१३-१४ मध्ये दोन कोटींची विकास कामे पूर्ण केली असून ६७.५७ लाखांची अतिरिक्त कामे केली आहेत. तर सन २०१४-१५च्या आर्थिक वर्षात त्यांनी शासनाकडून मिळणाऱ्या दोन कोटी रुपयांच्या विकास कामांबाबत नियोजन विभागाला प्राप्त झालेल्या पहिल्या हप्त्यातील ६६.६६ लाख रुपयांची कामे मार्गी लावली आहेत. उर्वरित निधीतही त्यांनी विकासकामे प्रस्तावित केली आहेत.मोर्शीचे आमदार अनिल बोंडे यांनीही सन २०१३-१४ मध्ये दोन कोटींची विकास कामे पूर्ण केली आहेत.
आमदार निधी खर्च करण्यात जिल्हा सरस
By admin | Updated: July 23, 2014 23:22 IST