नैसर्गिक आपत्ती : शासनाकडे अहवाल पाठविणारदर्यापूर : जुलै व आॅगस्ट महिन्यात जिल्ह्यात झालेल्या पुरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील ८२ हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. परंतु मंत्रालयाच्या बैठकीनंतर हे नुकसान जास्त असल्यामुळे पुन्हा पाहणी करून सुधारित अहवाल पाठविण्याचे निर्देश होते. त्यामुळे जिल्हाधिकारी किरणकुमार गीत्ते यांनी रविवारी सुट्टीचा दिवस असतानाही दर्यापूर व भातकुली तालुक्यातील शेतात जाऊन पीक परिस्थितीची पाहणी केली. ज्या भागात सर्वाधिक नुकसान आहे त्या ठिकाणी ही पाहणी करण्यात आली. काही ठिकाणी अतिवृष्टीनंतरही पिकांमध्ये सुधारणा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी तातडीने मंगळवार, बुधवारपर्यंत अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी भातकुली, आमला, शिंगणापूर, वडूरा येथे भेटी दिल्या. इब्राहीम चौधरी, तहसीलदार राहूल तायडे, मंडल अधिकारी शहाणे आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी दर्यापूर तहसील कार्यालयाला भेट दिली असता यावेळी वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनी त्यांच्यासमवेत चर्चा केली. तालुक्यातील रखडलेले पुनर्वसन पूर्ण करावे, स्थानिक उपजिल्हा रुग्णालयाला वैद्यकीय अधीक्षक पद भरावे व दर्यापूर आगारावर आगार व्यवस्थापकाची नेमणूक करावी आदी महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. (प्रतिनिधी)
जिल्हाधिकाऱ्यांनी केली पीक परिस्थितीची पाहणी
By admin | Updated: August 17, 2014 22:54 IST