अचलपूर : वातावरणात होणारा बदल, तापमानातील चढ-उतार व अवेळी येणारा पाऊस यामुळे वेगवेगळ्या आजारांनी शहरात थैमान घातले असून जुळ्या शहरातील स्वच्छतेकडे नगर पालिकेचे साफ दुर्लक्ष आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.सर्दी, खोकला, थंडी वाजून ताप येणे, हातपाय दुखणे, कंबर दुखी, मळमळ होणे, डोके दुखणे आदी आजारांचे प्रमाण वाढू लागल्याने अचलपूर-परतवाड्यातील खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे. उपजिल्हा रुग्णालयातही बाह्यरुग्णांची संख्या वाढली आहे. अधून-मधून पावसाची रिपरीप सुरुच आहे. यामुळे तालुक्यातील गावागावांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष असल्याने विविध आजारांत वाढ होत आहे. मात्र डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार योग्य उपचार घेतल्यास हे आजार बरे होऊ शकतात. हवा आणि अन्नातून शरीरात प्रवेश करणाऱ्या विषाणुंमुळे सर्दी, खोकला, ताप येणे, उलट्या होणे, घसादुखी, अतिसार यासारख्या आजारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णसंख्येवरुन ही बाब दिसून येत आहे. साथीची लागण सुरु असल्याने खासगी व सरकारी रुग्णालयांत रुग्णांची संख्या वाढतच आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने प्रकल्पात, विहिरींमध्ये आणि नदीला नवीन पाणी आल्यानेही गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. दूषित पाण्यामुळेच जलजन्य आजार वाढत आहे. (शहर प्रतिनिधी)
अचलपुरात आजारांचा फैलाव
By admin | Updated: August 4, 2014 23:30 IST