मोहन राऊत
धामणगाव रेल्वे : ग्रामस्थांना पाणीपट्टी, घरपट्टीचे मागणीपत्र देऊन दीड महिना उलटला. आज किंवा उद्या भरतो, असे मालमत्ताधारकांकडून सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात कर भरला जात नसल्याने दोन वर्षात ६२ ग्रामपंचायतीमधील रहिवाशांकडे तब्बल दीड कोटींची थकबाकी आहे. मार्च महिना संपण्यापूर्वी वसुली कशी करायची, असा सवाल आता ग्रामसेवक, नवनियुक्त सरपंच, उपसरपंच व कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. त्यासाठी ग्रामविकास खात्याने नवा पॅटर्न राबविण्याची गरज आहे.
धामणगाव तालुक्यात ६२ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींतील पाणीपट्टी व घरपट्टी थकबाकीचे आकडे बघितले, तर डोळे दिपवणारे आहेत. ही वसुली व्हावी म्हणून ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी प्रत्येक घरी वसुलीसाठीचे मागणीपत्र (डिमांड नोट) फेब्रुवारी महिन्यातच वाटप केले. प्रत्येक घरी जाऊन कर भरावा, अशी आग्रहाची मागणी प्रशासकीय यंत्रणा करीत आहेत. मात्र, ही वसुली अद्यापही तीन ते चार टक्क्यांवर आहे. ग्रामपंचायत परिसरात पेन्शनधारक, शेतकरी, नोकरदार, कृषिव्यवसाय, स्वस्त धान्य दुकानदार, मेडिकल व विविध किराणा दुकान जनरल स्टोअर्ससोबतच सर्वसामान्य माणूस राहतो. पेन्शनधारकांना वर्षाकाठी बँकांना देण्यासाठी हयातीचा दाखला द्यावा लागतो. सोबतच नोकरदारांच्या इन्कम टॅक्स परतावा करताना ग्रामपंचायतीचा ८-अ असणे गरजेचे केल्यास यातून ग्रामपंचायतीची वसुली केली जाईल. वैयक्तिक योजनेच्या लाभार्थींमध्ये शिलाई मशीन, पशू व कृषि विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनेचा लाभ देताना ग्रामपंचायत कर निरंक असल्याचा दाखल्याची ग्रामविकास खात्याने सक्ती करण्याची गरज आहे. कृषी कर्जापासून तर वैयक्तिक कर्जापर्यंत घरपट्टी व पाणीपट्टी भरल्याशिवाय कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही, ही सक्ती जर ग्रामविकास खात्याने केली, तर ग्रामस्थांकडे थकीत असलेल्या कोट्यवधीची रक्कम वसूल होण्यास वेळ लागणार नाही. परिणामी ग्रामस्थांचाही ग्रामविकासात मोठा हातभार लागणार आहे.
ग्रामपंचायतने राबवाव्या आकर्षक योजना
ग्रामपंचायतीची सत्ता आता नव्या शिलेदारांच्या हाती आली आहे. मार्च अखेरपर्यंत शंभर टक्के वसुलीसाठी ग्रामपंचायत स्तरावर कूपन पद्धतीने आकर्षक योजना राबविण्याची गरज आहे. शिलाई मशीन, स्मार्ट टीव्ही, कूकर, मिक्सर दैनंदिन जीवनात ज्या बाबी लागतात, त्या वस्तूचा लकी ड्रॉ शंभर टक्के कर भरणाऱ्यांसाठी काढला, तर यातून अनेक ग्रामस्थ वसुली भरण्यासाठी पुढाकार घेऊ शकतात, असे मत काही ग्रामीण भागाच्या विकासाची जाण असलेल्या माजी सरपंच यांनी व्यक्त केली.
कोट
ग्रामस्थांकडे चार ते पाच चकरा मारूनही घरपट्टी व पाणीपट्टी वसुली झालेली नाही. ग्रामविकास खात्याने आता पुढाकार घेऊन नवी योजना राबवाव्यात. ग्रामपंचायतचा कर भरल्याचा निरंक दाखला मागणे गरजेचे आहे, तरच खऱ्या अर्थाने वसुली होऊ शकते.
- सतीश हजारे, सरपंच, मंगरूळ दस्तगीर
पान ३ चे लिड