अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात ३ आॅगस्ट पर्यंतच्या पंधरा दिवसांत पाच रुग्ण दाखल झाले आहेत. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या जनजागृती मोहिमेचा फज्जा उडाल्याचे दिसून येते. डेंग्यूचा वाढता प्रभाव आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे. काही वर्षांपासून जिल्ह्यात डेंग्यू आजाराचा वाढता प्रभाव पहावयास मिळत आहे. गेल्या वर्षांत डेंग्यू सदृश्य आजारांने १० ते १५ नागरिकांचा मृत्यू झाला. दिवसेंदिवस ही संख्या वाढती आहे. ताप आजाराचे रुग्ण तिन्ही ऋतुमध्ये पाहायला मिळत आहेत. डासांपासून होणाऱ्या आजाराचा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रसार होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता नागरिकांनीही आरोग्य विषयक सतर्कता बाळगणे अत्यावश्यक झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालतून डेंग्यूच्या रुग्णांमध्ये ३० टक्के वाढ झाल्याचे सिध्द होत आहे. त्यामुळे डास निर्मुलनासाठी शासनाकडून विविध प्रयत्न केले जात आहे. याकरिता प्रत्येक शहर व ग्रामीण भागात डास निर्मुलनसाठी जनजागृती केली जात आहे. मात्र डासापासून होणारी रोगराई फोफावत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील वाढते शहरीकरण, पाणी दूषित होण्याचे प्रमाण या आजारात आणखी भर टाकत आहेत. डेंग्यू आजार डासांमुळे पसरणारा विषाणुजन्य आजार आहे. एडीस डासाच्या मादीमुळे डेंग्यू आजारांची लागण होते. हा डास स्वच्छ पाण्यामध्ये अंडी देऊन आपली संख्या वाढवितो. तीव्र ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी, अंगावर लासर पुरळ, तीव्र पोटदुखी, गंभीर रुग्णास रक्तस्त्राव, असे डेंग्यू आजारांची लक्षणे आहे. डेंग्युच्या गंभीर रुग्णाचा प्लेटलेट कमी झाल्याने होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे आणि शॉकमुळे रुग्णाचा मृत्यूदेखील संभवतो. त्यामुळे डेंग्युचा प्रादुर्भाव रोखणे अत्यंत गरजेचे झाले आहे. १ जुलै ते ३ आॅगस्टपर्यंत इर्विन रुग्णालयात डेंग्यूचे १२ रुग्ण दाखल करण्यात आले. एक वर्षांत सुमारे १०० च्यावर डेंग्यू रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.
१५ दिवसांत डेंग्यूचे पुन्हा पाच रुग्ण दाखल
By admin | Updated: August 5, 2014 23:13 IST