शवयात्रेदरम्यान बँड वाजवला, घोषणाबाजीने परिसर दणाणला
परतवाडा : अचलपूर नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर परतवाड्यातील टपालपुरावासीयांनी तब्बल चार तास धरणे आंदोलन केले. यादरम्यान त्यांनी शवयात्रेदरम्यान वाजवला जाणारा बँड नगर परिषदेच्या आवारातच वाजवला. मुख्याधिकाऱ्यांसह नगरपालिका प्रशासनाविरुद्ध घोषणाही दिल्यात. मुख्याधिकाऱ्यांना कक्षाबाहेर येऊन लोकांच्या समस्या समजून घेण्यासही त्यांनी सुचविले.
स्थानिक टपालपुरा येथील नागरिकांनी सार्वजनिक हिताच्या मागण्यांकडे नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता पीआर कार्ड, घरकुल, पेव्हर, अर्धवट नाला बांधकाम, स्मशानभूमीतील कामांबाबत ११ डिसेंबरला दुपारी १२.३० ते ५ वाजेपर्यंत हे धरणे आंदोलन केले गेले.
नगर प्रशासनाच्या प्रतीकात्मक शवयात्रेला पोलीस प्रशासनाने अनुमती नाकारल्यामुळे ती काढण्यात आली नाही. पण, शवयात्रेदरम्यान वाजविला जाणारा बँड मात्र नगरपालिकेच्या आवारात टपालपुरावासीयांकडून वाजविला गेला.
दरम्यान, मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी कक्षाबाहेर येऊन नगर परिषद सभागृहात टपालपूरावासीयांचे म्हणणे ऐकून घेतले. कामाच्या अंदाजपत्रकासह नगरपालिका प्रशासनाकडून लिखित आश्वासन आंदोलनकांना दिले गेले. लिखित पत्रानंतर टपालपुरावासीयांनी धरणे आंदोलन संपविले.
धरणे आंदोलनात तुळशीराम धुर्वे, बंड्या साने, दशरथ बावनकर, रामेश्वर वानखडे, महादेव धुर्वे, रामदास हिवराळे, कैलास इंगळे, राजेंद्र वाघमारे, भीमराव कलाने, शंकर इंगळे, गोलू तोटे, गजू उईके, सीमा वानखडे, विठाबाई कलाणे, लता कलाणे, लोकाय जामूनकर, रेखा कोचे, चंद्रभान वानखडे, मंगला इंगोले, हीरा थोरात, अक्षय कांबळे, प्रवीण वानखडे, संजय जनबंधू, संदीप खडसे, किलोर तोटे, श्रावण अंबोरे, आकाश दहीकर यांच्यासह टपालपुरा निवासी सहभागी झाले होते.