वनविभागाच्या वसाहतीपुढील घटना : मोकाट श्वानांनी तोडले लचके
चिखलदरा : वनविभाग कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या वसाहतीपुढे सोमवारी पहाटे खवले मांजर मृतावस्थेत आढळून आले होते. सायंकाळी मात्र ते बेपत्ता झाले. कुत्र्यांनी लचके तोडून ते फस्त केल्याची माहिती आहे. थेट वनाधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानापुढे हा प्रकार घडल्याने पर्यटनस्थळावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर सुरुवात करताच वनविभागाच्या कर्मचारीसह वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे शासकीय निवासस्थान आहे. वनविभागाच्या या वसाहतीपुढे सोमवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास नागरिकांना खवले मांजर मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले. दिवसभर ते तेथेच पडून होते. परंतु, सायंकाळनंतर बेपत्ता झाल्याने दिवसा काही मोकाट कुत्र्यांनी लचके तोडून फस्त केल्याची चर्चा होती. यासंदर्भात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेल्या उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार बाला याला चिखलदरा येथील शासकीय निवासस्थान व कार्यालयात आणल्याने परिसरातील त्याच्याजवळील काही अधिकारी व वनकर्मचारीसुद्धा चांगले दहशतीखाली दिसून आले.
---------------