पथ्रोट : जुन्या काळातील नांदलेल्या घराण्यातील जमीनदारांची ओळख ही भरमसाठ शेती, शेतात जाण्याकरिता घोडे, विशेषत: रेंग्या (पायटांग्या) तसेच कुटुंबातील महिलांना नेण्या-आणण्याकरिता वापरल्या जाणाऱ्या पडद्याच्या दमण्या यावरून होत होती. आता शेती कमी झाली असली तरी अनेकांनी त्या जुन्या जमान्यातील छकडे, दमणी ठेवल्या आहेत.
पूर्वी वाहनाची व्यवस्था नसल्यामुळे बस स्टँडवर छकडे पाठवून पाहुणे घरी आणले जायचे. मात्र, कालांतराने यांत्रिक युगात ती व्यवस्थाच मागे पडली अन् दुर्मीळ झाली. पण, आजही काही पाटील व देशमुख मंडळीच्या घरी या वडिलोपार्जित वस्तू संग्रही ठेवल्या आहेत. १५ ते २० वर्षांपूर्वी घरच्याच घोड्यावर नवरदेव, घरच्याच दमणीतून नववधूला बँडबाजाच्या गजरात घरी आणले जाते होते. नवदाम्पत्याची गावात दमणीमध्ये मिरवणूक काढली जायची. अशा प्रसंगी झूल पांघरलेल्या बैलांनी ओढली जाणारी ही दमणी राजसी थाट वाटायचा. एकाच व्यक्तीला शेतात जायचे असेल, तर बैलबंडी ऐवजी छकडे वापरले जायचे.
वाहनांच्या किमती कोटींच्या घरात गेल्या असल्या तरी आजही काही ऐपतदार जमीनदारांकडे झालेल्या लग्नामध्ये घराण्याची ओळख म्हणून नवरीला पालखीत न आणता, वाजतगाजत सनईच्या आवाजात घरच्या दमणीत लग्न मंडपात आणले जाते, हे विशेष.
फाेटो कॅप्शन :अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चौसाळा गावातील नारायणराव काळमेघ यांच्या वाड्यात संग्रही जपून ठेवलेली दमणी