मानव-बिबट संघर्षाच्या अभ्यास समितीची पुणे येथे बैठक, एप्रिलमध्ये अहवाल सादर होण्याची शक्यता
अमरावती : गत काही वर्षांत राज्यात मानव व बिबट संघर्षात मोठी वाढ झाली असून, बिबट्यांची मृत्यू संख्यादेखील वाढली आहे. त्यानुसार बिबट्यांच्या हालचाली आणि मानवाला होणाऱ्या त्रासाबाबत वनरक्षकांकडून दैनंदिन मॉनिटरिंग करण्यात येत आहे.
मानव-बिबट संघर्षाचा अभ्यास करण्यासाठी गठित ११ सदस्यीय समितीची पुणे येथे सोमवारी बैठक पार पडली. ही समिती एप्रिलमध्ये मानव-बिबट संघर्षाबाबतचा अहवाल सादर करणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार वन्यजीव अभ्यास मंडळाच्या बैठकीत जानेवारी २०२१ मध्ये मानव- बिबट संघर्षाचा अभ्यास करण्यासाठी एक तांत्रिक समिती नेमण्यात आली आहे. या समितीला अहवाल सादरीकरणासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. यापूर्वी समितीच्या दोन बैठकी झाल्या असून, वनरक्षक, वनपाल, वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांकडून बिबट- मानव संघर्षाविषयीचा लेखाजोखा गोळा करण्यात आला आहे. जंगल अथवा शहरी भागात खरेच बिबट्याचा त्रास आहे अथवा नाही. यासंदर्भात ही तांत्रिक समिती अभ्यास करीत आहे. बिबट्यांच्या मृत्युच्या कारणांचा अभ्यास करणे, त्यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना सुचविणे, बिबट्यांमुळे मनुष्य हानीच्या घटनांमध्ये झालेल्या वाढीचा अभ्यास करणे व मानव बिबट संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी उपाययोजना सुचविणे याबाबत तांत्रिक अभ्यास करून अहवाल शासनाकडे सादर करणार आहे. १५ फेब्रुवारीपासून बिबट संदर्भात वनरक्षकांकडून दैनंदिन मॉनिटरिंग सुरू आहे. वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या माध्यमातून बिबट्याबाबतची माहिती वनरक्षक या समितीकडे पाठवित आहेत.
------------------
पुणे येथे साेमवारी अभ्यास तांत्रिक समितीची बैठक पार पडली. दररोज ३ ते ४ वनरक्षकांकडून बिबट-मानव संघर्षाबाबतची माहिती मिळत आहे. बिबट्याने मानवावर सर्वाधिक हल्ले केले, अशा भागात समिती दौरा करणार आहे. एप्रिलमध्ये वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे सादर केला जाईल.
- सुनील लिमये, समिती अध्यक्ष तथा अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव (पश्चिम) मुंबई