प्रशासनाचे दुर्लक्ष
चांदूर बाजार : कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव जिल्ह्याला चिंतेत टाकणारा ठरला आहे. त्यामुळे प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले. परंतु ह्या निर्बंधाची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी तरी प्रशासनातील अधिकाऱ्यांना वेळ आहे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण निर्बंध असतानाही लग्नातील तोरण आणि मरणाच्या ठिकाणाची गर्दी कमी झालेली नाही.
जिल्ह्यात फेब्रुवारीपासून पुन्हा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. ही वाढ आजपर्यंत कायम आहे. कोरोनाची साखळी तुटावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जात आहे. त्या अंमलातही येऊ लागल्या आहेत. जिल्हाभर जमावबंदी, संचारबंदी, लॉकडाऊन अशा प्रकारचे निर्बंध लादल्या जात आहे. अशात फेब्रुवारी ते मे या महिन्यात लग्नसराईच्या धूम सुरू आहे.
लग्नसोहळ्यात २५ वऱ्हाडी मंडळींना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. अंत्यसंस्कारासाठी केवळ २० जणांना उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली आहे. असे असताना घरोघरी मोठमोठे लग्न सोहळे साजरे केले जात आहे. नागरिकांनी केवळ लग्नाचे ठिकाण बदलले असून ते आता लॉन, मंगल कार्यालय ऐवजी आपल्या कॉलनीत किंवा घरासमोर मंडप टाकून केल्या जात आहे. यात उपस्थित लोकांची संख्या कमी झालेली नाही. केवळ नवरदेवाची वाजत-गाजत मिरवणूक वगळता सर्वच प्रक्रिया धूमधडाक्यात पार पडल्या जात आहे. यात सर्वाधिक लग्न सोहळे ग्रामीण भागात होत आहे.
अनेक लग्न सोहळा मध्ये ३०० ते ४०० पेक्षा अधिक जणांची उपस्थिती दिसत आहे. यावर ग्रामीण भागात तर हळदीचा कार्यक्रम सर्रास डीजे, बँड लावून साजरा केल्या जात आहे.
मरणालाही गर्दी
अंत्यसंस्कारासाठी सुद्धा २० पेक्षा कितीतरी पटीने नागरिकांची उपस्थिती असते. परंतु या दोनही ठिकाणी होणाऱ्या गर्दीकडे संबंधित प्रशासनाकडून लक्ष दिल्या जात नाही. अथवा या परिस्थितीबाबत कोणीही तक्रार करीत नाही. तसेच ज्यांची जबाबदारी व निर्बंधाची अंमलबजावणी करून घेण्याची आहे असे अधिकारीही लक्ष देत नाही. उलट अशा लोकांची गर्दी चर्चेत राहते, अशी गर्दी मग त्यांना अभिमानास्पद वाटू लागते. सुखात गेले नाही तरी चालेल, मात्र दु:खात गेले पाहिजे, अशी ग्रामीणांची भावना असते. कोरोनाकाळातही ती प्रबळ ठरत आहे.
बॉक्स
पोलीसच हवे
आता ग्रामीण भागात होणारी अशी गर्दी रोखण्यासाठी पोलिस प्रशासनने पुढे आले पाहिजे. जेणेकरून वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे. गेल्या वर्षी सुरू झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव चा फटका अनेक ग्रामीण भाग बचावला होता. तसेच पहिल्या लाटेत तालुका, पोलीस, आरोग्य प्रशासनाने रस्त्यावर उतरून कोरोना पासून गाव खेडे वाचविली होती. मात्र या दुसऱ्या लाटेने सर्वाधिक फटका हा ग्रामीण भागात बसत आहे. या लाटेत नागरिकांचा गलथान कारभार सह प्रशासन ची हेतुपुरस्सर डोळेझाक ही कारणीभूत ठरत आहे.