धामणगाव तालुक्यात अशास्त्रीय उपचार, चाचणी न घेता आठ दिवस करतात घरीच उपचारमोहन राऊत/ धामणगाव रेल्वे : वैद्यकीय व्यवसायाची ना पदवी, ना कोणतेही प्रमाणपत्र, मात्र स्वतःच्या दुचाकी किंवा चारचाकी वाहनात सलाईन, इंजेक्शन, गोळ्या घेऊन थेट घरोघरी उपचार करणारे बोगस डॉक्टर ग्रामीण भागातील जनतेच्या जिवाशी खेळत आहेत. आतापर्यंत या बोगस डॉक्टरांमुळे देवगाव परिसरात अनेक रुग्णांचे बळी गेला असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
धामणगाव तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वेगाने सुरू आहे. ग्रामीण भागात दररोज पन्नासहून अधिक रुग्ण पॉझिटिव्ह निघत आहेत. एकीकडे कोविड रुग्णालयांमध्ये बेड रिक्त नाही. ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा असल्याची स्थिती आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्ण आपल्या गावातच औषधोपचार घेतात. याचाच फायदा हे बोगस डॉक्टर घेत आहेत. कोरोना चाचणी करण्यास सांगण्याऐवजी, मी आजार बसवतो, असा विश्वास दिला जात असल्याने नागरिकही त्यांच्याकडून विनाचौकशी उपचार घेत आहेत.
नामांकित डॉक्टरच्या चिट्ठीप्रमाणे देतात उपचार
तालुक्यात ग्रामीण भागात कोरोणा चाचणी घेण्याचे प्रमाण वाढले आहे. ज्या रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत, त्या रुग्णांचे घर हे बोगस डॉक्टर गाठतात. काही बनावट व्हिडीओ दाखवितात. त्यामुळे संबंधित रुग्ण घाबरून शहराच्या ठिकाणी न जाता, गावातच या बोगस डॉक्टरकडून घरीच सलाईन, औषधी घेतात. नामांकित डॉक्टर जे औषध वापरतात, तेच औषध रुग्णांना ते देतात. आठ दिवस या रुग्णांना घरी ठेवले जाते. ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यास तातडीने दुसऱ्या दवाखान्यात दाखल करण्याचा सल्ला देण्यास मात्र हे बोगस डॉक्टर विसरत नाहीत. तोपर्यंत किमान हजार रुपये संबंधित रुग्णाकडून वसूल केले जातात.
शोधमोहीम राबविणार कधी?
दोन वर्षांपूर्वी बोगस डॉक्टरांचे पेव फुटल्याचे समोर आल्याने आरोग्य विभागाने बोगस डॉक्टर शोधमोहिमेचा धडक कृती कार्यक्रम राबवला होता. त्यानंतर ही कारवाई थंडावली. विशेषत: या डॉक्टरांना मदत करणारे कंपाऊंडरही स्वत:ला डॉक्टर समजून रूग्णांवर औषधोपचार करीत आहेत.
ग्रामसमितीला कारवाईचे अधिकार
शासन निर्णयानुसार आता बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी जिल्हास्तरीय स्वतंत्र कमिटी आहे. फक्त तालुकास्तरीय समिती त्यास मदत करते. ग्राम समितीलादेखील कारवाईचे अधिकार दिले आहेत. मात्र, सर्व कागदांवरच असल्याचे पाहायला मिळते.
--------------
गावात उपचार घेण्यापेक्षा प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व शहराच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी जाऊन आपली कोरोना चाचणी करावी. वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला अधिक मोलाचा असतो. परिणामी योग्य उपचार रुग्णाला मिळतो
डॉ. हर्षल क्षीरसाग, तालुका आरोग्य अधिकारी, धामणगाव रेल्वे
----------------
कोरोनाग्रस्त रुग्णांनी घाबरून न जाता, त्वरित उपचार करून घेणे गरजेचे असते. योग्य मार्गदर्शन व हेल्पलाइनची व्यवस्था करण्यात आली आहे.
डॉ . आकाश येंडे, धामणगाव रेल्वे