अमरावती : जिल्ह्यातील दोन प्रयोगशाळांमध्ये कोरोनासंदर्भात आरटी-पीसीआर चाचणी केली जाते. यामध्ये पीडीएमसीची खासगी लॅब असून, या लॅबमध्ये दररोज ४०० चाचण्या होत आहेत. चाचण्यांसाठी खासगीत एक हजार रुपये या दराने आकारणी होत असल्याने जिल्ह्यात रोज चार लाखांचा खर्च कोरोना चाचण्यांसाठी होत आहे.
जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढायला लागला. त्यामुळे चाचण्यांच्या संख्येतही वाढ झाली. जिल्ह्यात आरटी-पीसीआर चाचणी करणाऱ्या दोन प्रयोगशाळा आहेत. यामध्ये अमरावती विद्यापीठाची शासकीय लॅब आहे, तर पीडीएमएमसीची खासगी लॅब आहे. याव्यतिरिक्त काही नमुने नागपूर येथूनही तपासले जातात. जिल्ह्यात सद्यस्थितीत तीन ते चार हजार नमुन्यांची तपासणी होत आहे. यामध्ये खरा भार हा विद्यापीठाचे विषाणू परीक्षण प्रयोगशाळेवरच आहे.
जिल्ह्यात मे महिन्यात विद्यापीठातील प्रयोगशाळा कार्यान्वित झाली. त्यापूर्वी नागपूर, वर्धा व अकोला येथील शासकीय प्रयोगशाळेत नमुने तपासणीला पाठविले जात होते. यामध्ये तीन ते चार दिवसांचा अवधी लागायचा. पीडीएमएमसीची लॅब ही दिवात्च्या सुमारास सुरू करण्यात आली. या केंद्रावर नमुने घेतले जातात व शहरातील काही लॅब कोरोना संशयितांचे नमुने घेऊन त्यांची तपासणी पीडीएमएमसीच्या लॅबमध्ये करतात. आरटी-पीसीआर चाचण्यांसाठी साधारणपणे ९०० ते ९५० रुपयांची आकारणी आवश्यक असताना, रुग्णांच्या घरून स्वॅब घेण्यासाठी खासगी लॅबद्वारे १००० ते ११०० रुपये आकारणी केली जात आहे.
बॉक्स
रॅपिड अँटिजेन चाचण्यांवर खासगीत बंदी
जिल्ह्यातील खासगी लॅबमध्ये रॅपिड अँटिजेन चाचणीवर आता बंदी घालण्यात आलेली आहे. अशा ११ लॅबच्या चाचण्यांवर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बंदी घातली. या चाचण्यांसाठी ५०० ते ७०० रुपये घेतले जायचे. आयसीएमआरचे पोर्टलवर नियमितपणे माहिती दाखल होत नव्हती व काही अनियमिततेचे प्रकार होत असल्याचा आरोप झाल्याने या चाचण्यांवर बंदी घालण्यात आली आहे.
बॉक्स
खासगीमध्ये जादा शुल्काची आकारणी
रुग्णांचे स्वॅब घेऊन मान्यातप्राप्त लॅबमध्ये नमुने तपासणी करण्यासाठी काही खासगी लॅबद्वारे एजंटही नेमले आहेत. हे प्रतिनिधी संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन नमुने घेतात. नमुने ठेवण्यासाठी त्यांच्याजवळ आवश्यक तो आईस बॉक्स राहत नाही व हे प्रतिनिधीदेखील पुरेसे प्रशिक्षित नसल्यामुळे अनेकदा अहवाल चुकीचे येत असल्याच्या तक्रारी आहेत.
बॉक्स
आतापर्यंत ३,१२,५६६ नमुन्यांची तपासणी
जिल्ह्यात आतापर्यंत आरटी-पीसीआरच्या ३,१२,५६६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये विद्यापीठ लॅबद्वारे १,४७,७५३ नमुने, तर पीडीएमएमसीमध्ये ८,५७२ तसेच ध्रुव व इतर खासगी लॅबद्वारे १७,४३७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असल्याचा जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचा अहवाल आहे.
पाॅईंटर
आतापर्यंत आरटी-पीसीआर चाचण्या : १,७३,७६२
शासकीय लॅबमधील चाचण्या : १,४७,७५३
खासगी लॅबमधील चाचण्या :२६,००९
आतापर्यंत रॅपिड अँटिजेन : १,३७,६४३