अमरावती : सध्या आमच्याकडे येणारे रुग्ण किंवा ज्या बाधितांचे मृत्यू होत आहेत, ते पाहता, अनेकांकडून चाचणी उशिरा करण्यात आल्याचे किंवा त्यांना उशिरा टेस्ट करायला सांगितल्याचे निदर्शनास आले. ज्या काळात आजारात धोका अधिक असतो, त्यावेळी अनावश्यक चाचण्या करीत रुग्ण अनेक दवाखान्यात फिरत असल्यानेच धोका वाढत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी बुधवारी सांगितले.
रुग्णांना विनाकारण ‘एचआरसीटी’सारख्या महागड्या तपासण्या करायला सांगितले जाते. मात्र, कोविड-१९ चाचणीचा सल्ला दिला जात नाही किंवा अनेकदा रुग्णही सदर चाचणी करण्यास तयार नसतात. या कारणामुळे रुग्ण नाहक गंभीर होतो. सर्दी-पडसे, तापासारखी लक्षणे असतील, तर स्वत:हून कोरोना चाचणी आग्रह धरला पाहिजे. कोरोना प्रतिबंधांसाठी मास्क, सुरक्षित अंतर व सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रीत चाचणी व लसीकरणाचा समावेश करून तशी पंचसूत्री पाळण्याचे आवाहन त्यांनी केले.
सर्दी, पडसे, ताप ही लक्षणे कोरोनाची असू शकतात, हे आपण समजून घेतले पाहिजे. त्यामुळे लक्षणे असणाऱ्यांनी चाचणी करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांनीही चाचणी करून घेतली पाहिजे. जोपर्यंत आपण जास्तीत जास्त रुग्ण शोधून काढणार नाही आणि त्यांना विलगीकरणात ठेवणार नाही, तोपर्यंत साथीची शृंखला तुटणार नसल्याचे ते म्हणाले.
सप्टेंबरच्या तुलनेत फेब्रुवारीत प्रमाण दुपटीवर
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची व बाधितांच्या मृत्यूची सर्वाधिक संख्या सप्टेंबरमध्ये नोंदविण्यात आली होती. त्यानंतर मात्र, फेब्रुवारीपासून पुन्हा उचल खाल्ली आणि अजूनही ती वाढत आहे. सप्टेंबरच्या तुलनेत फेब्रुवारीत रुग्णसंख्या व बाधितांच्या मृत्यूची संख्या दुपटीवर गेली. कोरोनाबाधितांचा दुसरा चढता आलेख पाहता जास्त जागरुकता येणे आवश्यक असल्याचे सीएस म्हणाले.
बॉक्स
आजाराचा बाऊ नको
साथीविषयी अनेक गैरसमजही साथ वाढण्यास कारणीभूत ठरतात. आजाराचा बाऊ करून त्याचे नियंत्रण करता येणार नाही. त्यासाठी पंचसूत्री पाळली गेली पाहिजे. सर्वप्रथम ज्यांच्यासाठी लस उपलब्ध आहे, त्यांनी लसीकरण करून घ्यावे व त्यानंतरदेखील दक्षता अवलंबलीच पाहिजे. चाचणीही वेळीच केली पाहिजे, असे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले.
कोट
शहरात व तालुक्यांनाही लसीकरणाची सुविधा तसेच ठिकठिकाणी चाचणी सुविधाही उपलब्ध आहे. सर्वांनी लस घ्यावी. वेळीच निदान व तत्काळ उपचार हे ध्येय ठेवूया. मास्कचा वापर, हातांची स्वच्छता, सुरक्षित अंतर, लसीकरण व लक्षणे दिसताच चाचणी ही पंचसूत्री प्रत्येकाने पाळावी.
- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक