अमरावती : शालेय शिक्षण विभागाने पाचवी ते आठवीच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील ९,२१८ शिक्षकांची कोरोना चाचणी २३ जानेवारीपासून केली जाणार आहे. या काेरोना तपासणीचे मॉनिटरिंग जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे राहणार आहे.
कोरोना संसर्गामुळे मार्चपासून शाळा बंद आहे. मध्यंतरी २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीच्या शाळा सुरु करण्यात आल्या. मात्र, आता कोरोना ओसरू लागल्याने पाचवी ते आठवीच्या शाळा कोरोना नियमावलींचे पालन करून सुरू होत आहे. तत्पूर्वी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करणे बंधनकारक केले आहे. २३ ते २५ जानेवारी या तीन दिवसांच्या कालावधीत शिक्षकांची आरटी-पीसीआर चाचणी करून अहवाल शाळांमध्ये सादर करावा लागणार आहे.
शिक्षकांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यांना उपचारार्थ दाखल व्हावे लागेल, अशी नियमावली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणीची व्यवस्था आरोग्य यंत्रणाद्वारे करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाने १४ तालुकानिहाय शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची यादी आरोग्य यंत्रणेला दिली आहे.
--------------------
कोट
पाचवी ते आठवीच्या शिक्षकांची आरटी-पीसीआर कोरोना चाचणी केली जाणार आहे. मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी त्याअनुषंगाने पत्र दिले. आरोग्य यंत्रणेला तशा सूचना दिल्या असून, शनिवारपासून शिक्षकांचे लसीकरण होणार आहे. तीन दिवसांचे नियोजन केले आहे.
- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती.
--------------------
लसीकरणासाठी ‘महसूल’चा डेटा मागविला
शिक्षकांचे लसीकरण आटोपल्यानंतर आता महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांना लस दिली जाणार आहे. त्यानुसार आरोग्य यंत्रणेने जिल्ह्यातील महसूलचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची यादी मागविली आहे. पुढील आठवड्यात महसूल कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जाईल, अशी माहिती आहे. जिल्ह्यात २५०० हजार महसूलचे अधिकारी, कर्मचारी असल्याची माहिती आहे.