लोकमत विशेषअमरावती : इच्छाशक्तीच्या बळावर विपरीत परिस्थितीतही गावाचे रूपडे पालटता येते, याचे ज्वलंत उदाहरण शहानूरच्या अडाणी आणि अशिक्षित आदिवासींनी प्रस्तुत केले आहे. दुर्गम मेळघाटच्या कुशीत वसलेल्या शहानूर या आदिवासींच्या गावात ग्राम परिसर विकास समितीमार्फत पर्यटकांच्या सोयीसाठी विविध सुविधा पुरविण्यात येत आहे. यातून स्थानिक आदिवासींना रोजगार उपलब्ध झाला आहे. हा आगळावेगळा उपक्रम वनविभागाच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे. अकोट तालुकातील शहानूर गावात जेमतेम ८० आदिवासी कुटुंब राहतात. आतापर्यंत येथील आदिवासी अठराविश्वे दारिद्र्यात जीवन जगत होते. मात्र, वनविभागाच्या मदतीने आता ते मुख्य प्रवाहात येऊ लागले आहेत. त्याचप्रमाणे सर्व सोयी-सुविधा उपलब्ध होत असल्याने अलीकडे शहानुरात पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. नरनाळा किल्ला, नरनाळा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्याची ओढच आता पर्यटकांना लागली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अकोट वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक उमेश उदल वर्मा (भा.व.से.) यांच्या पुढाकाराने व सहकार्याने ग्रामविकास परिसर समितीने समुदाय संघटनांच्या माध्यमातून वने आणि वन्यप्राणी संवर्धनाचा नवा पायंडाच कोरकुंनी पाडला आहे. वनविभागाच्या सहकार्याने येथील कोरकू आदिवासी सद्यस्थितीत येथे येणाऱ्या पर्यटकांची निवास व भोजनाची व्यवस्था तसेच सोव्हीनियार शॉप, पर्यटकांची करमणूूक व जंगल सफारी, ट्रेकिंग अशा विविध सुविधा पुरविण्यात व्यस्त आहेत. सन २०११-१२ मध्ये शहानूर गावाचे वार्षिक उत्पन्न १ लाख ३३ हजार ७६९ इतकेच होते. मात्र, या नव्या उपक्रमामुळे गावाने सन २०१४-१५ मध्ये ६ लाख ९१ हजार ५२१ इतक्या उत्पन्नाचा आकडा पार केलाय. ‘इको टुरिझम’ मुळेच हा गाव विकासाच्या प्रवाहात आलय. (प्रतिनिधी)
‘इको टुरिझम’मधून कोरकूंचा विकास
By admin | Updated: September 12, 2015 00:10 IST