अमरावती - कोकण महोत्सवात नाचणीची भाकरी व कुळथाचे पिठले जेव्हा पन्नास रूपयाला विकले गेले तेव्हा या महोत्सवात सहभागी झालेल्या मंडणगड तालुक्यातील तळेघर येथील भूमिकन्या कृषी बचत गटातील महिलांना आश्चर्य वाटेल नाही तरच नवल.केवळ चार दिवसात २० हजार रुपयांची विक्री झाली. मंडणगड तालुक्यातील १५० लोकवस्तीचे तळेघर हे छोटेसे गाव. तळेघर ते अमरावती हा प्रवास किमान ५०० ते ६०० किलोमीटर्सचा प्रवास त्यांनी केला. आयुष्यात प्रथमच १३ दिवस घर सोडण्याचा टिपीकल कोकणी बाईच्या आयुष्यातील हा विक्रमच म्हणावा लागेल. अमरावती येथे कोकणी महोत्सवानिमित्त मंडणगड येथील बचत गटाने सहभाग घेतला. दापोली येथील अनिश पटवर्धन यांच्या सोबत तळेघर येथील भूमिकन्या शेतकरी महिला बचत गटातील दोन महिला अर्चना गणपत करावडे, अरूणा सीताराम पारदुले, कॉलेजमधील चार विद्यार्थी सुप्रिया माने, अजय पारदुले, सुमित करावडे व सुजाता म्हसकर या दौऱ्यात सहभागी झाल्या होत्या. पाच दिवस अमरावती व पाच दिवस नागपूरला कोकणातल्या सर्व पदार्र्थांचा स्टॉल त्यांनी मांडला होता. अमरावती व नागपूरकरांचा त्याला भरभरून प्रतिसाद लाभला. विदर्भ व कोकण सर्वांगाने भिन्न, त्यामुळे वैदर्भीय लोकांना कोकणातील पदार्थांचे विलक्षण आकर्षण आहे. तळेघरचा हा ग्रुप या तेरा दिवसात खूप काही शिकला. मालाची उचलपाचल, मालाची विक्री ग्राहकांशी संवाद, रोजचा हिशोब, नफा-तोट्याचे गणित आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्या कोकणतील आपल्याच पदार्थांचे महत्व त्यांना समजले.विदर्भातल्या ४७ अंश सेल्सिअस वातावरणात कोकणातील गारवा आठवू लागला. आपण करत असलेले काम यावर चर्चाविनिमय होऊ लागल्या. यातूनच नवीन उर्मी निर्माण झाली. गाव आणि तालुक्याबाहेर आपल्या उत्पादनांना लोक एवढे पसंत करतात, हे प्रथमच या महिलांना जाणवले. या दौऱ्यानंतर आणखी काय करायला हवे, याचे नियोजन करण्यास सुरूवात झाली. एकूणच भूमिकन्या कृषी महिला बचत गटातील महिलांना अमरावती - कोकण महोत्सव प्रेरणदायी ठरला. विदर्भातील अमरावती, नागपूर येथे कोकणातील एक बचत गट जातो आणि तेथे कोकणी उत्पादनांचा स्टॉल लावतो, हे सारे येथील महिलांना आनंददायी तर आहेच, पण नव्याने या क्षेत्रात येणाऱ्या बचतगटांसाठी वेगळा पॅटर्न ठरणारा आहे. - प्रशांत सुर्वेतळेघरच्या महिला बचत गटाचे यशमुंबई, पुण्यात कोकण महोत्सव होतात, हे येथील महिलांना ठाऊक होते. मात्र, विदर्भात अमरावती येथे प्रथमच मंडणगड तालुक्यातील तळेघर येथील भूमिकन्या बचत गटाने आपले स्टॉल मांडले. अमरावती येथील या स्टॉल्सना अनेकांनी भेट दिली. स्टॉलला भेट देणाऱ्यांनी कोकणी उत्पादनांना अक्षरश: डोक्यावर घेतले. असा प्रयोग सतत झाल्यास कोकणातील आंबा, काजूबरोबरच पदार्थाना मागणी वाढेल हे नक्की.
कोकणची पिठलं-भाकरी अमरावतीत
By admin | Updated: June 12, 2015 00:40 IST