वरूड : जूनपर्यंत कोरोनाची मोठी यादी वरूड तालुक्यात होती. परंतु प्रशासनाच्या दक्षतेमुळे कोरोनावर मात केली. मात्र, नागरिकांचा स्वैराचार महाल आणि अनावश्यक गर्दी होऊन विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढली. यामुळे आठ दिवसात पुन्हा कोरोनाने तोंड वर काढले. दिवसाला दोन, तीन रुग्णांच्या नोंदी होऊ लागल्या, तर सोमवारी ३३ वर्षीय माहेला डेल्टा प्लस पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य प्रशासनात खळबळ माजली. यामुळे वरूडकरांनो पुन्हा सावधान, कोरोना आपला पाठलाग करीत आहे, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्यातील १४ तालुक्यांपैकी वरूड तालुका दुसऱ्या लाटेत हॉटस्पॉट बनला होता. हजारो कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची यादी झाली होती. परंतु, प्रशासनाने यावर नियंत्रण मिळविण्याकरिता शर्थीचे प्रयत्न केल्याने कोरोना हद्दपार झाल्यागत परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, गत आठवड्यापासून तालुक्यासह शहरात दिवसागणिक दोन-तीन कोरोना रुग्णाच्या नोंदी होत आहे. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर २४ ऑगस्टला वरूड शहरातील एका ३३ वर्षीय माहिलेचा कोरोनासदृश स्ट्रेन म्हणजे डेल्टा प्लसचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. एकीकडे डेंग्यू, मलेरियाचा प्रादुर्भाव असताना डेल्टा प्लसने प्रशासनात खळबळ माजविली आहे. याबाबत आरोग्य विभागाची भागदौड सुरू झाली असून, तातडीच्या बैठका सुरू झाल्या आहेत.