अमरावती : निंभा येथील एका चिमुकलीवर झालेल्या लैंगिक शोषणाबद्दल आरोपीला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सतीश नारायण काळे (२०, रा. निंभा, ता. भातकुली) या आरोपीला शनिवारी दुपारी न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे.याबाबत न्यायालयात दाखल दोषारोप पत्रानुसार निंभा गावातील ६ वर्षीय चिमुरडी १८ आॅगस्ट २०१३ रोजी आपल्या घराच्या अंगणात खेळत होती. काही वेळाने ती अंगणात नसल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले. त्यामुळे तिच्या आईने गावात शोधशोध सुरु केली. यादरम्यान शेतकाम करणाऱ्या काही महिला तिच्या चिमुकलीला घेऊन येत असल्याचे लक्षात आले. ती भेदारलेल्या अवस्थेत आढळून आली. तिला विचारणा केली असता भयावह वास्तव पुढे आले. गावातीलच सतीश नारायण काळे याने त्या चिमुकलीला बैलबंडीत फिरवण्याचे आमिष दाखवून नेले व अतिप्रसंग केल्याचे तिच्या आईला समजले. त्यामुळे पीडित मुलीच्या आईने तत्काळ बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपी सतीश काळेविरुध्द भादंविच्या कलम ३७६ (२)(ख) अन्वये गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक बालाजी भांडे हे तपास करीत होते. पोलिसांनी २१ आॅक्टोबर २०१३ रोजी न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. न्यायालयाने चार साक्षीदार तपासले. पीडित मुलगी व तिच्या आईची साक्ष तपासल्यानंतर अतिप्रसंगाचा गुन्हा सिध्द होऊ शकला नाही. मात्र कलम ९ (म) नुसार १२ वर्षांखालील मुलीवर लैंगिक शोषण अत्याचारप्रकरणी दोषी ठरले. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्या न्यायालयाने आरोपीला पाच वर्षांचा कारावास, १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
चिमुरडीचे लैंगिक शोषण; आरोपीला पाच वर्षांचा कारावास
By admin | Updated: August 30, 2014 23:19 IST