अमरावती : पशुसंवर्धन विभागाच्या दवाखान्यांची सकाळी ८ ते १२ व दुपारी ३ ते ५ ही बेळ बदलून यापुढे सकाळी ९ ते दुपारी ४.३० या वेळेत विनाखंड पशूंना आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. यासंदर्भात पशुसंवर्धन खात्याने ४ जानेवारी रोजी परिपत्रक जारी केले.
जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे १४ तालुक्यांत १०१, तर राज्य शासनाचे ६७ असे एकूण जिल्हाभरात १६८ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. या दवाखान्यांच्या माध्यमातून पशुधनाला पशुआरोग्य सेवा पुरविली जाते. आतापर्यंत हे दवाखाने दोन सत्रांत उघडत होते. यात सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत पहिला टप्पा, तर दुपारी ३ ते ५ असा दुसरा टप्पा याप्रमाणे पशुवैद्यकीय दवाखान्यांची सेवा उपलब्ध होत होती. परंतु, आता पशुवैद्यकीय दवाखाने सोमवार ते शुक्रवारी सकाळी ९ ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत कामकाज चालणार आहे. यात दुपारी १ ते १.३० अशी जेवणाची सुटी राहील. शनिवारी सकाळी ८ ते दुपारी १ ही वेळ राहणार आहे. पशुदवाखान्याच्या नवीन वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्याचे आदेश पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्तांनी ६ जानेवारी रोजी पत्राव्दारे दिले आहेत.
कोट
शासनाच्या पशुसंर्वधन विभागाने पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कामकाजाच्या वेळापत्रकात बदल सुचविले. नवीन वेळापत्रकासंदर्भात पशुसंर्वधन आयुक्त कार्यालयाचे आदेश मिळालेत यानुसार अंमलबजाणी केली जाईल.
- विजय राहाटे,
जिल्हा पशुसंर्वधन अधिकारी, जिल्हा परिषद