राजेश जवंजाळ - अमरावतीभारताचा स्वातंत्र्य लढा अनेक मार्गांनी लढला गेला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जहाल क्रांतीकारी लढा, लोकमान्य टिळक, आगरकर यांनी लेखणीव्दारे समाजजागृती व महात्मा गांधींनी अहिंसक मार्गाने नि:शस्त्रपणे असहकारात्मक आंदोलनाने इंग्रज सरकारला हादरुन सोडले होते. त्यावेळी येथील जगप्रसिध्द श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ (श्री हव्याप्र मंडळ) या संपूर्ण चळवळीचे केंद्रबिंदू ठरले होते.स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी वीर वामनराव जोशी यांनी इंग्रज सरकारविरुध्द लढा उभारण्यासाठी वऱ्हाड प्रांतात ठिकठिकाणी आखाडे, व्यायामशाळा सुरु करण्यासाठी युवकांना प्रोत्साहित केले. याच दरम्यान म्हणजे १९१४ साली स्वातंत्र्य चळवळीने झपाटलेले अनंत कृष्णराव वैद्य व अंबादास कृष्णराव वैद्य या बंधुंनी हनुमान क्लबची स्थापना केली. १९१८ साली हनुमान क्लबचे नामांतर श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, असे झाले. त्यावेळी संस्थेच्या प्रवाहात डॉ. शिवाजीराव पटवर्धन सहभागी झाले. १९२० सालापासून भारतीय राजकारणात गांधीयुगाला सुरुवात झाली. देशभर असहकार आंदोलन सुरु झाले. दिशाहीन युवकांना राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यात सामिल होण्याचा नवा मार्ग सापडला. यात हव्याप्र मंडळाने हिरारीने सहभाग घेतला होता. त्यावेळी सरकारी शाळांवर बहिष्कार टाकण्यात आला व चळवळीतील कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय शाळा सुरु केली.
श्रीहव्याप्र मंडळ होते स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र
By admin | Updated: August 14, 2014 23:28 IST