अमरावती : येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांच्या मुलाखतींचे सत्र रविवारी आटोपले. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर भाजपच्या उमेदवारीसाठी अनेकांनी गर्दी केली. येथील शासकीय विश्राम भवनात भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. बाळ भेगडे व प्रदेश सचिव मेधाताई कुळकर्णी यांनी विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. तत्पूर्वी काही पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून विधानसभानिहाय भाजपच्या राजकीय परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. प्रारंभी अमरावती विधानसभा मतदारसंघात इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. महायुतीत भाजपच्या वाट्याला अमरावती जिल्ह्यात चार मतदारसंघ आले आहेत. यात अमरावती, मोर्शी, धामणगाव रेल्वे आणि मेळघाट या मतदारसंघाचा समावेश आहे. त्यानुसार आ. भेगडे व मेधाताई कुळकर्णी यांनी मतदारसंघनिहाय मुलाखतीचे सत्र आटोपले. इच्छुक उमेदवारांमध्ये सर्वाधिक गर्दी ही अमरावती मतदारसंघासाठी असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. अमरावती मतदारसंघाच्या मुलाखती आटोपताच मेळघाट, तिवसा, धामणगाव रेल्वे, मोर्शी, अचलपूर, दर्यापूर व बडनेरा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. केंद्रात मोदी शासन आरुढ होताच विधानसभा निवडणूक लढण्याचे अनेक भाजप जणांनी मनसुबे तयार केल्याचे चित्र रविवारी मुलाखती दरम्यान बघावयास मिळाले. मुलाखतीसाठी समर्थकांसह इच्छुकांनी एकच गर्दी केल्याने शासकीय विश्रामभवनाला यात्रेचे स्वरुप आले होते. विशेषत: तिवसा व अचलपूर मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात असून ते भाजपला मिळावे, असा सूर मुलाखतीदरम्यान उमटला. मुलाखतीसाठी आलेल्या समर्थकांनी इच्छुक उमेदवारांच्या बाजूने नारेबाजी केल्याने स्पर्धेचे वातावरण जाणवले. तब्बल तीन ते चार तास चाललेल्या मुलाखतीत जिल्ह्यातील भाजपक्षात अंतर्गत वाद आणि हेवेदावे असल्याचे दिसून आले. मात्र, सामान्य कार्यकर्त्यांना कधी ‘अच्छे दिन’ येतील याविषयी चर्चा ऐकावयास मिळाली. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वीच स्थानिक भाजप नेत्यांमध्ये स्पर्धा दिसली. (प्रतिनिधी)
भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी
By admin | Updated: August 3, 2014 23:04 IST