नियमांना बगल : २० वर्षांपासून संस्थाचालकांकडून लूट गणेश वासनिक अमरावतीसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत सुरू असलेल्या विनाअनुदानित शारीरिक शिक्षण महाविद्यालयांच्या संस्था चालकांनी विद्यार्थ्यांचे प्रवेश मिळावे, यासाठी चक्क परप्रातांत ‘दलाल’ नेमले होते. या दलालांच्या माध्यमातून बीपीएड अभ्यासक्रमांसाठी परप्रांतीय विद्यार्थ्यांचे प्रवेशाच्या आधारे गत २० वर्षांत संस्थाचालकांनी प्रचंड ‘लक्ष्मी’ जमविल्याची माहिती मिळाली आहे.विद्यापीठ कायद्यानुसार कोणत्याही अभ्यासक्रमाची पदवी मिळविताना विद्यार्थ्यांची महाविद्यालयात ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. मात्र, शारीरिक शिक्षण महाविद्यालयात कागदोपत्री प्रवेश असताना परप्रांतीय विद्यार्थ्यांची उपस्थिती हजेरी पटलावर ९० टक्के दर्शविण्यात आलीे. विना अनुदानित तत्त्वावर शारीरिक शिक्षण महाविद्यालये सुरू केलेत; पण विद्यार्थी कसे, कोठून मिळवावे? यासाठी संस्था चालकांनी स्थानिक प्रवेश नियमावली गुंडाळून परप्रांतातील विद्यार्थ्यांना बीपीएड पदवीचे आमिष दाखवून प्रवेश दिले. शारीरिक शिक्षण महाविद्यालयांना १९९६-९७ पासून विद्यापीठाने मान्यता प्रदान केली आहे. प्रारंभी बीपीएड अभ्यासक्रमाला अधिक महत्त्व होते. त्यामुळे विनाअनुदानित शारीरिक शिक्षण महाविद्यालयांमध्येही प्रवेशासाठी प्रचंड गर्दी उसळली होती. नेमकी हीच बाब हेरून संस्था चालकांनी अव्वाच्या सव्वा शुल्क आकारून बीपीएड अभ्यासक्रमाला प्रवेश दिले. त्या काळात बीपीएड अभ्यासक्रमाला वाव असताना संस्था चालकांनी मर्जीनुसार प्रवेश शुल्क आकारून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट केली. मात्र २००५ नंतर शारीरिक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी ओसरू लागली. मोठा गाजावाजा करून शारीरिक शिक्षण महाविद्यालये स्थापन करण्यात आले. अशातच विना अनुदानित महाविद्यालयात शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा फौजफाटा कसा सांभाळावा, या विवंचनेत खासगी संस्थाचालक आलेत. या गर्तेतून मार्ग काढण्यासाठी संस्था चालकांनी अखेर ‘पैसे द्या, पदवी घ्या’ हा नवा फंडा वापरला. त्याकरिता परप्रांतातून प्रवेशासाठी विद्यार्थी मिळावे, यासाठी दलाल नेमले. विशेषत: ज्या राज्यात बीपीएड अभ्यासक्रम पदवीला महत्व आहे, त्या राज्यांमध्ये संस्था चालकांनी ‘लक्ष्य’ केले. दलालांच्या माध्यमातून केवळ कागदोपत्री नाममात्र ‘प्रवेश घ्या, थेट परीक्षेला या’, ‘प्रॅक्टिकल’ला येण्याची गरज नाही, अशा काही अटींवर परप्रांतीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे पीक आले होते. ‘कोमात’ जाण्याच्या मार्गी असलेल्या विना अनुदानित शारीरिक शिक्षण महाविद्यालयांना परप्रांतीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाने बराच आर्थिक दिलासा मिळाला. मात्र बनावट विद्यार्थी, परीक्षा अर्जही प्राचार्यांनी भरणे, नियमबाह्य कारभार, अप्रशिक्षित कर्मचारी आदींमुळे या महाविद्यालयांचा कारभार चव्हाट्यावर आला. गत वर्षीपासून बीपीएड अभ्यासक्रम प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया लागू झाली. बनावट विद्यार्थी प्रवेशाला ब्रेकअमरावती : महाविद्यालयातील विद्यार्थी कोण? कोणते महाविद्यालय? किती प्रवेश? यासर्व बाबी तपासण्याची जबाबदारी केंद्रीय प्रवेश समितीने स्वीकारली. त्यामुळे आपोआपच परप्रांतीय बनावट विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला ‘ब्रेक’ लागला आहे. परिणामी अमरावती जिल्ह्यात विद्यापीठाच्या रेकॉर्डनुसार सात विनाअनुदानित शारीरिक शिक्षण महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी प्रवेशाची वानवा आहे. त्यापैकी काही महाविद्यालये पूर्णत: बंद तर काही महाविद्यालये शेवटची घटका मोजत आहेत. परंतु शारीरिक शिक्षण महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश कागदोपत्री असताना यापूर्वी ते रोखण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार का घेतला नाही? यातच सारे काही दडले आहे. (क्रमश:)विद्यापीठ प्रशासनही जबाबदारशारीरिक शिक्षण महाविद्यालयांमध्ये यापूर्वी परप्रांतीय विद्यार्थ्यांचे कागदोपत्री प्रवेश दिले जात असताना ते वेळीच विद्यापीठाने थांबविले नाही. परिणामी संस्था चालकांचा हा प्रवास अविरतपणे सुरुच राहिला. बनावट विद्यार्थी प्रवेश प्रकरणी विद्यापीठाचा संबंधित विभागही तितकाच जबाबदार आहे. याबाबत नव्याने चौकशी केल्यास बरेच मासे जाळ्यात अडकणार, हे विशेष!विद्यार्थ्यांचा धर्मशाळेत मुक्कामजिल्ह्यातील शारीरिक शिक्षण महाविद्यालयांमध्ये काश्मीर, हरियाणा, राजस्थान, उत्तरप्रदेश, पंजाब, दिल्ली आदी राज्यांमधून विद्यार्थ्यांचे प्रवेश व्हायचे. थेट परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांचे मुक्काम चित्रा चौकातील सेंट्रल लॉज, वसंत टॉकीज नजिकच्या झुनझुनवाला धर्मशाळेत असायचा. परीक्षा संपेपर्यत धर्मशाळा विद्यार्थ्यांसाठी बुकींग करण्यास संस्थाचालक पुढाकार घेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
विद्यार्थी प्रवेशासाठी परप्रांतात दलाल
By admin | Updated: January 22, 2017 00:06 IST