---------------
अश्लील हरकती, युवकाविरुद्ध गुन्हा
अमरावती : खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदनगर येथे अंकित विघे (३५) याच्याविरुद्ध पोलिसांनी भादंविचे कलम ३५४, ३५४ अ, ५०९ अन्वये ८ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला. अंगणवाडीतील मुलांकडे पाहून शिवीगाळ व अश्लील कृत्य करीत असल्याची तक्रार त्याच्याविरुद्ध दाखल करण्यात आली. नागरिकांनी हटकले असता, अंकित हा ब्लेड ने हात कापण्याची व फाशी घेण्याची धमकी देत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. सहायक पोलीस निरीक्षक सोनू झामरे पुढील तपास करीत आहेत.
------------------
वकील लाईन येथे अवैध दारूविक्री
अमरावती : कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत वकील लाईन येथे ६०० रुपयांच्या देशी दारूच्या पावट्या पकडल्या. याप्रकरणी सचिन कैलास येळणे (३५, रा. मोरबाग, पटवा चौक) व राजेश भगवानदास आठिया (४५, रा. चित्रा चौक) यांच्याविरुद्ध पोलिसांनी दारूबंदी कायद्यान्वये कारवाई केली.
--------------
लक्ष्मीनगर येथे अवैध दारूविक्री
अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मीनगर येथे राहुल रामेश्वर हरणे (३२) याच्याकडून ७८० रुपयांच्या १३ देशी दारूच्या पावट्या जप्त करण्यात आल्या. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
---------------
कामाला नकार, कामगारांकडून मारहाण
अमरावती : फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लुम्बिनीनगर येथे राजेश अवधूतराव तायडे (५७) यांना दोन कामगारांनी मारहाण केली. त्यांनी याच परिसरातील रहिवासी भगतद्वयांना घरी काम करण्यास पाचारण केले. मात्र त्यानंतर काम नसल्याचे सांगितले. यावरून दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच डोक्यावर दारूची बॉटल मारली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध भादंवि कलम ३२४, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला. ७ डिसेंबर रोजी ही घटना घडली.
-----------------
जलसा बारमध्ये वेळेच्या मर्यादेचे उल्लंघन
अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अर्जुननगर स्थित जलसा बार ७ डिसेंबर रोजी रात्री १ वाजता सुरू होता. याप्रकरणी भादंविचे कलम १८८, २६७, २७० सह ५१ ब राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, ३, ४ साथीचे रोग अधिनियमान्वये बारमालक श्रीकांत रामकृष्ण धर्माळे (५४, रा. अर्जुननगर), सुनील नेतनराव राऊत (२४, रा. नागपूर रोड), प्रीतम लीलाधर उकडे (२८, रा. सरफननगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
-------------
हॉटेलपुढून बुलेट नेली चोरून
अमरावती : चित्रा चौकातील हॉटेल मथुरापुढून ५ डिसेंबरच्या रात्री ९ च्या सुमारास दुचाकी लंपास करण्यात आली. प्रतीक शरदकुमार मिश्रा (रा. गोविंदनगर) यांच्या मालकीची ही बुलेट त्यांचा मित्र तेथे घेऊन गेला होता.
------------
क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यावर चाकूने वार
अमरावती : गांधी आश्रम परिसरात क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यावर चाकूने वार करणारा अजय चव्हाण तसेच त्याचे सहकारी कैलास अंभोरे, विकी खडसे, धनराज दिहाडे यांच्याविरुद्ध खोलापुरी गेट पोलिसांनी भादंवि कलम ३०७, ३२४, ३२३, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.
पोलीस सूत्रांनुसार, ६ डिसेंबर रोजी सायंकाळी तक्रारदाराच्या बहिणीची मुले बॅडमिंटन खेळत होते. भारत बांगर यांच्या घराच्या छतावर पडलेले फूल बांबूने काढत असताना मेन लाईनला धक्का लागल्याने अजय चव्हाण याच्या घरची वीज गेली. त्यावेळी तक्रारदार महिलेसोबत अजय चव्हाणची बाचाबाची केली. सात डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता याच मुद्द्यावर तो घरापुढे येऊन शिवीगाळ करीत असताना महिलेचे वडील रतन खंडारे तेथे आले. त्यांच्यावर अजयने चाकुहल्ला केला आणि डाव्या कुशीत व मांडीत वार करून गंभीर जखमी केले. आजोबा रमेश खंडारे व चुलतभाऊ विष्णू खंडारे हे भांडण सोडविण्यासाठी आले असता, कैलासने रमेश खंडारे यांच्या पायावर, तर निखिल व धनराज यांनी विष्णू खंडारे यांच्या डोक्यावरून, पायावर काठीने मारून त्यांना गंभीर जखमी केले. याप्रकरणी खोलापुरी गेट पोलिसांनी गुन्हा नोंदवून कैलास अंभोरे, निखिल खडसे, धनराज दिहाडे यांना अटक केली. प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक घारपांडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक तामटे व कर्मचारी करीत आहेत.
-----------------
अलीमनगर येथे युवकावर चाकुहल्ला
अमरावती : नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अलीमनगर येथे अक्रम खान फिरोज खान (२५) याच्या डोक्यावर ७ डिसेंबर रोजी शेख साजिद उर्फ शेख रुस्तम (रा. मुजफ्फरपुरा) याने चाकूने वार केला. त्यापूर्वी सहा डिसेंबर रोजी मद्यपान करून शिवीगाळ करीत असलेल्या शेख अहमद शेख हुसेनला घरी परत जाण्यास अक्रमने सांगितले होते. याप्रकरणी नागपुरी पोलिसांनी भादंविचे कलम ३२४, ५०४, ३४ अन्वये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दुसरीकडे शेख साजिद शेख अरुम (२५, रा. मुजफ्फरपुरा) याच्यावर अक्रम खान फिरोज खान याने चाकुहल्ला करून जखमी केले. यावेळी मन्नान (दोन्ही रा. अलीमनगर) याने त्याला पकडून ठेवले, अशी तक्रार नागपुरी गेट पोलीस ठाण्यात देण्यात आली. ईदगाह कबरस्ताननजीक ही घटना ७ डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी भादंविचे कलम ३२४, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.