मोहन राऊत
फोटो
धामणगाव रेल्वे
कुणाला दुर्धर आजार असो अथवा सिकलसेल, सकाळ असो वा रात्र, कुणीही फोन केला किंवा साधा मेसेज आला तरी गरजू रुग्णांपर्यंत पोहोचून रक्तदानाची चळवळ शहरात शिवराज गणेश मंडळाकडून अविरतपणे सुरू आहे.
धामणगाव शहरातील शुभम अशोक बिडकर या ध्येयवेड्या युवकाने आठ वर्षांपूर्वी शिवराज गणेश मंडळाची स्थापना केली. दहा दिवसांचा उत्सव, धमाल अशी भूमिका न ठेवता वर्षभर गरजू, निराधार, दिव्यांग व्यक्तींना आधार देण्यासाठी हे मंडळ राबत आहे. मंडळाच्यावतीने शहरात दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन वर्षातून तीन वेळा करण्यात येते. शुभम बिडकर शिबिरात प्रथम रक्तदान करतो आणि त्यानंतर कार्यकर्ते सामाजिक जबाबदारी ओळखून रक्तदान करतात. चोविसाव्या वर्षी दहा वेळा शुभम बिडकर यांनी रक्तदान केले आहे.
कोरोनाकाळात दिला निराश्रितांना आधार
कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या सुरुवातीला लॉकडाऊन लागल्याने अनेकांनी शेकडो किलोमीटर अंतर पायी प्रवास केला. त्यांच्यासाठी शिवराज गणेश मंडळाचे कार्यकर्ते देवदूत ठरले होते. पायी जाणाऱ्यांना चहा, पाणी, नाष्टा, जेवणाची अविरत सेवा शुभम बिडकर यांच्या पुढाकाराने देण्यात आली होती.