अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव विभागांतर्गत ढाकणा वनपरिक्षेत्रात वनकर्मचाऱ्यांनी बुधवारी रक्तदान केले. यावेळी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी, गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार व ढाकणा वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी उपस्थित होते. वनकर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हाकेला प्रतिसाद देत रक्तदानात हिरीरीने सहभाग घेतला.
मेळघाटातील अतिदुर्गम व आदिवासीबहुल विरळ लोकवस्ती असल्याने २० ते २५ पिशव्या जमा होतील. अशी अपेक्षा होती. परंतु हिरालाल चौधरी यांच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद देत ढाकणा वनपरिक्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी, संरक्षण कुटीवरील मजूर आदींनी रक्तदानात सहभाग नोंदविला. सावऱ्या, भांडूम, दाभिया, बोरीखेडा या गावांतील तरुण व ग्रामस्थांनीदेखील रक्तदानात सहभाग घेतल्याने ५० पिशव्या रक्ताच्या जमा झाल्यात. शासकीय रक्त पेढी अमरावती व उपजिल्हा रुग्णालय, धारणी व त्यांच्या पूर्ण टीमचे पवन भावसार, सुमित चौथमल, रोहित पाल, सुरज मालवीय, पंकज मोरे, वन्यजीव प्रेमी प्राजक्ता राऊळ, मनीष ढाकुलकर, कपिल बोरकर आदींनी सहकार्य केले.