अमरावती : दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसानंतर शहरातील लोकवस्त्यांमध्ये सर्पांचा संचार वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. गुरुवारी २३ तर शुक्रवारी ७ साप पकडण्यात आले असून ते छत्रीतलाव परिसरात सुरक्षित सोडण्यात आले. साप विषारी असो की बिनविषारी; तो दिसला की, भल्या भल्यांच्या हृदयाचे ठोके वाढल्याशिवाय राहत नाही. मागील दोन दिवसांपासून शहराच्या कानाकोपऱ्यात साप निघत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पावसामुळे सापांचे आश्रयस्थान असलेल्या बिळात (वारुळ) पाणी शिरल्याने त्यांच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण होतो. परिणामी साप हे सुरक्षित स्थळ शोधतात. त्यामुळे लोकवस्ती असलेल्या भागात सापांचा संचार वाढू लागला आहे. सापांचा संचार वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीसुद्धा पहावयास मिळत आहे. साप मनुष्याला घाबरतो, हे सर्वश्रुत आहे; मात्र, सापाला मनुष्यदेखील अधिक घाबरतो, हे घरात साप निघाल्यानंतर स्पष्ट होते. लोकवस्ती वाढल्याने सापांचे संरक्षण धोक्यात अमरावती : दस्तुरनगर परिसरातील रहिवासी सर्पमित्र नीलेश कंचनपुरे यांनी १९ जून रोजी २३ तर २० जून रोजी ७ साप पकडून त्यांना छत्री तलाव परिसरात जीवदान दिले आहे. पहिला पाऊस पडताच सापांचा संचार वाढल्याच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने सुरक्षिततेसाठी अद्यापपर्यंत कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. शहरात कवड्या व पादीवळ जातीचे सर्वाधिक साप मागील दोन दिवसांत पकडण्यात आल्याची माहिती कंचनपुरे यांनी दिली. झपाट्याने लोकवस्ती वाढत असल्याने खुल्या जागा आणि वनपरिक्षेत्रात मानवाने वास्तव्य सुरु केले आहे. त्यामुळे सापांचे भ्रमण आणि संरक्षण त्यामुळे धोक्यात आले आहे.साप दिसताच त्याला जीवे मारण्याची नकळत मानवाच्या डोक्यात कल्पना येते, ही मानसिकता सापांची संख्या कमी होण्यास कारणीभूत ठरत आहे. साप हा शेतकऱ्यांचा मित्र समजला जातो. मात्र त्याच्या चाव्यामुळे जीवाला धोका असल्याने त्याला संपविण्याचाच अधिक प्रमाणात विचार केला जातो. ही भावनाच साप नावाचा प्राणी संपविण्याच्या मार्गी लागल्याचे प्राणीतंज्ज्ञाने सांगितले.
सावधान! सर्पसंचार वाढला; एकाच दिवशी पकडले २३ साप
By admin | Updated: June 21, 2014 01:10 IST